नवी दिल्ली - दिल्लीमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नर्सकडून एका 2 महिन्यांच्या बाळाला अमानुष मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीत बाळाचा हातही मोडला आहे. दिल्लीच्या एका रुग्णालयातील धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर हा भीषण प्रकार उघड झाला आहे. यामध्ये एक नर्स दोन महिन्यांच्या बाळाला अमानुष मारहाण करताना दिसत आहे. 24 जुलैला रात्री ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस सध्या याचा अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हाथरसमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबाने आपल्या 2 महिन्यांच्या बाळाला उपचारासाठी दिल्लीच्या विवेक विहार नर्सिंग होममध्ये दाखल केलं होतं. नर्सिंग होममध्ये बाळाचे वडील दिवसातून एकदा त्याला पाहण्यासाठी येत असत. कारण, तिथे थांबण्याची परवानगी नव्हती. याच दरम्यान 24 जुलै रोजी त्यांना नर्सिंग होममधून वडिलांना एक फोन आला आणि सांगितलं गेलं, की तुमच्या बाळाला दुखापत झाली आहे आणि त्याचा हातही फ्रॅक्चर झाला आहे. बाळाचा चेहराही सुजलेला होता.
वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, नर्सिंह होममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फुटेज चेक केलं गेलं. यात एक नर्स चिमुकल्याला मारहाण करताना दिसली. यानंतर बाळाचे वडील सबीब यांनी विवेक विहार ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली. सबीब यांच्या म्हणण्यानुसार, त्यांची पत्नी गुलाफ्शाने 22 मे रोजी हाथरसच्या रुग्णालयात जुळ्या बाळांना जन्म दिला होता. यानंतर 16 जुलै रोजी मुलगा अहान याची तब्येत बिघडल्यानs त्याला अलिगडमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र इंफेक्शन जास्त असल्याने त्यांनी त्याला दिल्लीच्या विवेक विहारच्या केयर न्यू बॉर्न अँड चाईल्ड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केलं.
सबीब यांनी 24 जुलै रोजी फोन आला आणि त्यामध्ये तुमच्या बाळाला दुखापत झाली. त्याचा हात मोडला असं सांगण्यात आलं. यामुळे त्यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिलं. सीसीटीव्ही फुटेजमधून खुलासा झाला की सौम्या नावाची नर्स 24 जुलैला पहाटे साडेतीनच्या सुमारास बाळाला मारताना दिसली. सबीब यांनी याबाबत डॉक्टरांना जाब विचारला असता त्यांनी बाळाच्या वडिलांनाच धमकी दिली. सबीबला नर्सिंग होमकडून शांत राहाण्याची धमकीही दिली गेली. यानंतर बाळाला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करून चेकअप केलं असता बाळाचा हातही फ्रॅक्चर झाल्याचं समोर आलं. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.