मुंबई - पोलीस ठाण्यात आरोपीचा वाढदिवस साजरा करणे प्रकरण वरिष्ठांच्याही अंगलट आले आहे़ भांडुप पोलीस ठाण्यातील दोन अधिकाऱ्यांसह तीन अंमलदारांचे निलंबन करण्यात आल्यानंतर आता पोलीस ठाण्यातील कारभारावर नियंत्रण ठेवण्यात असमर्थ ठरलेल्या वरीष्ठ पोलीस निरीक्षक रमेश खाडे यांची संरक्षण आणि सुरक्षा विभागात बुधवारी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर शाम शिंदे यांची नेमणूक करण्यात आली आहे.गेल्यावर्षी आॅगस्ट महिन्यात भांडुप पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास पन्हाळे यांची सशस्त्र पोलीस दलात उचलबांगडी करण्यात आली होती. त्यांच्यावरही भांडुपमध्ये एकामागोमाग वाढणारे गुन्हे व त्याविरुद्ध भांडुपकरानी उठवलेल्या आवाजामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या सोनापूरमधील तरुणाचा वाढदिवस पोलीस ठाण्यात साजरा करतानाचे फोटो, व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले आणि पोलीस दलात एकच खळबळ उडाली. याविरुद्ध ही भांडुपकरांनी तीव्र संताप व्यक्त केला. याविरुद्ध उपायुक्त अखिलेश सिंह यांनी विभागीय चौकशी सुरु केली. उपनिरीक्षक पंकज शेवाळे आणि सचिन कोकरे यांच्यासह तीन अंमलदारांचे निलंबन करत त्यावेळी ड्युटीवर असलेल्या नाईट पीआयसह भांडुप पोलीस ठाण्याचे वपोनि रमेश खाडे यांची खातेनिहाय चौकशी सुरु करण्यात आली. चौकशी पूर्ण होताच खाडे यांच्या संरक्षण आणि सुरक्षा विभागात बदलीचे आदेश बुधवारी काढण्यात आले.
‘या’ वरिष्ठ निरीक्षकाचीही बदली
खाडे यांच्या बदलीसोबतच बुधवारी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याचे वपोनि संजीव घाडगे यांची सशस्त्र पोलीस दलात बदली करण्यात आली. त्यांच्या रिक्त जागेवर विशेष शाखेतील मृत्यूंजय हिरेमठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागपाडा पोलीस ठाण्याचे वपोनि संतोष बागवे यांची विशेष शाखेत तर, त्यांच्या रिक्त जागी पूर्व नियंत्रण कक्षात नियुक्तीस असलेल्या शालीनी शर्मा यांची नेमणूक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेतील वपोनि राजेश काळे यांच्यावर अंधेरी पोलीस ठाण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.