नवी मुंबई : होळीच्या अनुषंगाने पोलिसांनी खबरदारी घेत ठिकठिकाणी नाकाबंदी लावली होती. त्याशिवाय संशयित ठिकाणी धडक देऊन कारवाया केल्या जात होत्या. सोमवारी रंगपंचमी साजरी करत उघड्यावर मद्यपान करणाऱ्या १५०हून अधिकांवर कारवाई करण्यात आली आहे.
परिमंडळ एकमध्ये उपायुक्त पंकज डहाणे, परिमंडळ दोनमध्ये उपायुक्त विवेक पानसरे व वाहतूक शाखा उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या सूचनेनुसार स्थानिक पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आली होती. त्यासाठी रविवारी रात्री होळी पेटल्यापासून ते सोमवारी संध्याकाळी धुळवडीचा रंग उतरेपर्यंत शहरात पोलिसांचा बंदोबस्त होता. यावेळी विविध कलमान्वये ६००हून अधिकांवर कारवाई करण्यात आल्या.
ड्रंक अँड ड्राइव्हच्या ४३ कारवाया मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाया केल्या जात होत्या. त्यानुसार सोमवारी सकाळी ते रात्री पर्यंत पोलिस आयुक्तालय क्षेत्रात ४३ वाहनांवर कारवाई केल्याचे उपायुक्त तिरुपती काकडे यांनी सांगितले. २१ ते २४ मार्च दरम्यान ड्रंक अँड ड्राईव्हच्या एकूण ६३ कारवाया करण्यात आल्या आहेत.
मद्यविक्री केंद्राबाहेरच रंगल्या पंगतीसोमवारी सर्वत्र मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी झाली. यादरम्यान रंगात रंगून गेलेल्या तळीरामांनी मोठ्या संख्येने मद्यविक्री केंद्राबाहेर गर्दी केली होती. झोपडपट्टी परिसरात धिंगाणा घालणाऱ्या तळीरामांना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल केले आहेत.
गांजा विक्रेत्यांसह सेवन करणाऱ्यांवर कारवाईमागील दोन दिवसांत पोलिसांनी गांजाचे सेवन करणाऱ्यांसह विक्री करण्यासाठी आलेल्यांवर देखील कारवाया केल्या आहेत.खांदेश्वर पोलिसांनी अक्षय पांचाळ याच्याकडून १७ हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. तर नेरुळ पोलिसांनी राहुल राठोड याच्याकडून १० हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. सणाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त अधिक ठेवण्यात आला होता.
सुरक्षारक्षकाला मारहाण घणसोली येथील महानगर पालिकेच्या विभाग कार्यालय इमारतीच्या आवारात सोमवारी दुपारी काहीजण गांजाची नशा करत होते. त्यामुळे तिथले सुरक्षारक्षक बांगर यांनी नशा करणाऱ्या तरुणांना हटकण्याचा प्रयत्न केला. याचा राग आल्याने तरुणांच्या टोळक्याने त्यांना मारहाण केली. याप्रकरणी रबाळे पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर एकाला ताब्यात घेतले असून इतरांचा पोलिस शोध घेत आहेत.