लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रामदासपेठेतील हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये जबरदस्तीने प्रवेश करून हॉटेलच्या संचालकांवर हल्ला करणारा आरोपी गौरव तुली आणि त्याच्या साथीदारांनी अटकपूर्व जामीन मिळविला. या संबंधाने ते शनिवारी रात्री पोलीस ठाण्यात दाखल झाले. वृत्त लिहिस्तोवर सीताबर्डी पोलीस त्यांची चौकशी करीत होते.मंगळवारी १८ फेब्रुवारीला रात्री ९.४५ ला ही घटना घडली होती. आरोपी गौरव तुली, त्याचा सासरा, त्यांचा वाहनचालक, बलजीत जुनेजा आणि गुरुपी्रत जुनेजा ही मंडळी मंगळवारी कोराडी मार्गावरील एका लग्न समारंभात सहभागी झाली होती. तेथे लहान मुलांच्या भांडणातून गौरव आणि लग्नात सहभागी झालेल्या एका पाहुण्यामध्ये जोरदार वाद झाला. तेथे कसेबसे निपटले. पाहुणे सेंटर पॉइंटमध्ये मुक्कामी थांबल्याची माहिती कळाल्याने गौरव आणि उपरोक्त आरोपी रात्री ९.४५ च्या सुमारास अचानक हॉटेलमध्ये शिरले. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना विचारणा केली असता आरोपी मोठमोठ्याने आरडाओरड करू लागले. ते एकून हॉटेलचे संचालक अंगद आणि त्यांचा भाऊ अर्जुन समोर आले. त्यांच्यावर आरोपींनी हल्ला चढवला. अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकीही दिली. मारहाणीच्या दरम्यान सोनसाखळी आरोपींनी तोडली. हॉटेलचे कर्मचारी धावले आणि त्यांनी आरोपींना आवरले. त्यानंतर सुधीर तुपोने यांनी सीताबर्डी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला. तेव्हापासून पोलीस आरोपींचा शोध घेत होते. शनिवारी रात्री आरोपी गौरव आणि अन्य चार जण पोलीस ठाण्यात पोहचले. त्यामुळे त्यांना अटक करण्यात येणार, अशी चर्चा सुरू झाली. मात्र, आरोपींनी या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळवला. तो घेऊन ते ठाण्यात आल्याचे सांगून त्यांची आम्ही चौकशी करत आहोत, असे सीताबर्डीचे ठाणेदार राजपूत यांनी सांगितले.
सेंटर पॉईंट हॉटेल हल्ला प्रकरण : हल्लेखोरांनी मिळवला अटकपूर्व जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 1:01 AM
रामदासपेठेतील हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये जबरदस्तीने प्रवेश करून हॉटेलच्या संचालकांवर हल्ला करणारा आरोपी गौरव तुली आणि त्याच्या साथीदारांनी अटकपूर्व जामीन मिळविला.
ठळक मुद्देसीताबर्डी पोलिसांकडून चौकशी