गोव्यामध्ये 4 वर्षांच्या मुलाची हत्या करणाऱ्या सूचना सेठने धक्कादायक खुलासे केले आहेत. सूचना सेठने पोलिसांना चौकशीदरम्यान हैराण करणाऱ्या गोष्टी सांगितल्या. वेंकटरमन आपल्या मुलाला भेटू नयेत यासाठी ती गोव्याला गेली होती. सूचनाने तिच्या मित्रांना आणि कुटुंबीयांना सांगितलं होतं की, तिचा मुलगा चिन्मय हा तिच्या नवऱ्यासारखा दिसतो आणि तिला तिच्यापासून वेगळ्या झालेल्या नवऱ्याची आठवण करून देतो.
मुलाचे वडील वेंकटरमन यांनी शनिवारी सुचनाला फोन केल्याचंही समोर आलं आहे. रविवारी मुलासोबत वेळ घालवण्यासाठी मुलाला बंगळुरूच्या राजाजीनगर येथील घरी आणण्यास सांगितलं होतं. मात्र, सूचनाने पतीच्या घरी जाण्यास नकार दिला. तिने वेंकटरमन यांना बंगळुरूच्या सदाशिवनगर जवळील सार्वजनिक ठिकाणी भेटण्यास सांगितलं होतं.
वेंकटरमन सकाळी 11 वाजता आले. सदाशिवनगरमध्ये 2 तासांहून अधिक वेळ थांबले. पण सूचना आली नाही. त्यांनी तिला फोन, मेसेज, इमेल करण्याचा प्रयत्न केला पण कोणतंच उत्तर मिळालं नाही. यानंतर ते कामानिमित्त इंडोनेशियाला गेले. सूचना सेठने आपल्या मुलाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी एक भयंकर प्लॅन रचला होता. मात्र, ती त्यामध्ये यशस्वी झाली नाही आणि ती पकडली गेली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोव्याहून बंगळुरूला जात असताना 4 तास वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे तिला उशीर झाला.
पोलिसांनी कॅब ड्रायव्हरला फोन केला आणि सूचनाला न सांगता एका पोलीस स्टेशनजवळ गाडी थांबवण्यास सांगितली. कॅब ड्रायव्हर गाडी नेमकी कुठे घेऊन चालला आहे याची सूचनाला माहिती नव्हती. पोलीस ठाण्याजवळ गाडी थांबताच तिला धक्का बसला, ती काही करण्याआधीच कर्नाटक पोलिसांनी तिला पकडलं. तिच्या बॅगची झडती घेतली असता त्यात सूचनाच्या मुलाचा मृतदेह आढळून आला.
4 तास वाहतूक कोंडी नसती तर कदाचित सूचना बंगळुरूपर्यंत पोहोचली असती आणि तिचा प्लॅन पूर्ण केला असता. गोव्यातील सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये सूचनाने आपल्या मुलाची हत्या केली. एक दिवस आधी वेंकटरमन यांनी सूचनाला व्हिडीओ कॉल केला होता. त्यांना आपल्या मुलाशी बोलायचं होतं. त्यावेळी तिने मुलाला भेटू शकता असं सांगितलं पण दुसऱ्याच दिवशी तिने मुलाची गळा आवळून हत्या केली. सूचना आपल्या पतीचा तिरस्कार करायची. दोघांनी 2010 मध्ये प्रेमविवाह केला होता. 2019 मध्ये त्यांना मुलगा झाला.
2020 मध्ये पती-पत्नीमध्ये भांडणं सुरू झाली. प्रकरण कोर्टात पोहोचल्यावर आईला मुलाचा ताबा मिळाला. तेव्हापासून सूचनाने आपल्या मुलाला पती वेंकटरमन यांना भेटू दिले नाही. वेंकटरमन यांनी यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. ज्यावर न्यायालयाने नुकतेच आदेश दिले की वेंकटरमन आपल्या मुलाला दर रविवारी भेटू शकतील.