मुंबई : विलेपार्लेच्या डोमेस्टिक एअरपोर्टवरील कंपनीत वरिष्ठ कार्यकारी अधिकाऱ्याला (सीईओ) जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी भारतीय कामगार सेना युनियनचा पदाधिकारी योगेश आवळे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याच्याकडून जीवाला धोका असल्याचे त्या अधिकाऱ्याने पोलिसांना सांगितले आहे.
तक्रारदार ज्ञानेश्वर शिंदे (३५) यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, २५ मे रोजी भारतीय कामगार सेनेच्या युनियनचे पदाधिकारी व सदस्यांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता डोमेस्टिक एअरपोर्ट टर्मिनल एक येथील इंडिगो बॅगेज मेकअप एरिया या ठिकाणी काम करणाऱ्या ४० ते ४५ लोडर व ड्रायव्हर कामगारांना धमकावून काम बंद करण्यास सांगितले होते.
इतकेच नव्हे तर त्या परिसरात असलेल्या १३ वाहनांच्या चाव्यादेखील काढून घेतल्या होत्या. तसेच इंडिगो कोच क्रमांक २८ मध्ये बसवून कामगारांना काम बंद पाडण्याच्या उद्देशाने टर्मिनल दोनवर नेण्यात आले. तेव्हा शिंदे यांनी कंपनीच्यावतीने आवळे, संजय कदम आणि इतर २० ते २५ जणांविरुद्ध कायदेशीर फिर्याद केली होती. त्यानंतर २० जून रोजी सेकंड शिफ्टसाठी शिंदे कामावर पोहोचले आणि चहा पिण्यासाठी त्यांचे सहकारी अंशुल मोहोड व विन्ससेन देवेंद्र यांच्यासोबत विमानतळ परिसरात असलेल्या कॅन्टीनमध्ये गेले होते.
शिंदे त्याच्याजवळ गेले तेव्हा, “तुझी हेकडी काढून टाकेन. तू आमच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार करतोस, तू आमच्या हिटलिस्टवर आहेस, तुझ्यामुळे सर्व मुलांचे एअरपोर्ट एन्ट्री पास जमा झाले आहेत.’’ असे म्हणत तो अन्य अधिकाऱ्यांना शिवीगाळ करू लागला. तू आता इथून निघून जा आणि याच्यापुढे जरा जपून राहा. आम्ही तुला जीवे ठार मारून पोलिस केस अंगावर घ्यायला तयार आहोत”, असे धमकावत आवळे निघून गेला.