ठाणे - मीरा भाईंदर आणि शहापूर या ठाणे ग्रामीणच्या कार्यक्षेत्रात जबरीने सोनसाखळी चोरणाऱ्या टोळीला ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी दिली. या टोळीकडून 22 गुन्हयांची उकल झाली असून त्यांच्याकडून सुमारे 20 लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
ठाणे ग्रामीणच्या मीरा भाईंदर, मुरबाड, गणेशपुरी आणि शहापूर या परिसरात दिवसा आणि रात्रीही सोनसाखळी चोरीचे प्रमाण अलिकडे वाढले होते. या अनुषंगाने हे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी शहापूर, मीरा भाईंदर आणि गणोशपूरी विभागात वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथकांची निर्मिती करण्यात आली होती. सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांच्या पथकाने केलेल्या तपासामध्ये मीरा भाईंदर भागातील एका सीसीटीव्ही फूटेजमध्ये मोटारसायकलवरुन आलेले दोघे सोनसाखळी हिसकावून पळून जात असल्याचे आढळले. यातील एक आरोपी परशुराम सॅलियन असल्याचे पोलीस रेकॉर्डवरुन उघड झाले. त्यानुसार सॅलियन आणि त्याचा साथीदार आनंदकुमार उर्फ सोनू सिंह (वय 28) यांना 28 सप्टेबर रोजी अटक करण्यात आली. सखोल तपासामध्ये त्यांनी नयानगर 5, मीरा रोड- तीन, काशीमीरा - 9 आणि भाईंदर एक अशा 18 गुन्हयांची कबूली दिली आहे. त्यांच्याकडून 13 लाख तीन हजार 500 रुपये किंमतीचे 446 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि जबरी चोरीसाठी वापरलेली मोटारसायकल असा 13 लाख 43 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. त्यांना 8 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. शहापूर, भिवंडी परिसरातून महिलांची मंगळसूत्रे आणि सोनसाखळी हिसकावून पळणाऱ्या गुंजल सांडे (वय 21), गोविंद उर्फ पप्या धमके (वय 21) आणि विजलय सातपुते (वय 25) या तिघांना सहायक पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून नऊ सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघड झाले असून त्यातील सात लाख 13 हजार 800 रुपयांचे 190 ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. त्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या आरोपींकडून आणखीही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.