उल्हासनगर - शहर गुन्हे अन्वेषण विभागाने सोनसाखळी चोरीप्रकरणी दोघांना अटक केली. त्यांच्याकडून सव्वा पाच लाखाचे दागिने व मोबाईल हस्तगत केले असून 9 गुन्ह्यांची कबुली दिली. उल्हासनगर पोलीस परिमंडळाच्या हद्दीत सोनसाखळी चोरीच्या प्रकारात वाढ झाल्याने पोलिस हैराण झाले होते. पोलीस चोरट्याच्या मागावर असताना, कॅम्प नं-4 संभाजी चौक परिसरात 65 वर्षाच्या वृद्धांची सोनसाखळी चोरीचा प्रकार गेल्या आठवड्यात घडला. गुन्हे अन्वेषण विभागाने सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्याआधारे त्यांचा शोध घेतला असता, राजा आरगुमन पड्याची उर्फ अंडाराजा व साहिल राजेश गुप्ता यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी त्यांना बोलते केल्यावर, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, विठ्ठलवाडी, शिवाजीनगर, मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 9 गुन्ह्याची कबुली त्यांनी दिली.
शहर गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केलेला राजा आरगुमन पड्याची हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याला मुंबई, उपनगरे, ठाणे, रायगड जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. तर त्याचा साथीदार साहिल राजेश गुप्ता हाही रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी दिली. दरम्यान, अब्बासी शाजोर सैय्यद यालाही दोन सोनसाखळीप्रकरणी अटक करून, एक लाख 5 हजार रुपयांची सोन्याची दागिने हस्तगत केले. त्यांच्याकडून अधिक गुन्हे उघड होण्याचे संकेत पोलीस अधिकारी महेश तरडे, मनोहर पाटील यांनी दिली आहे.