मुंबई - गोरेगाव पश्चिमेकडील प्रेम नगर येथील आदर्श सोसायटीत गणेशोत्सवाची वर्गणी जमा करताना दुकानदाराकडून जबरदस्तीने वर्गणीस्वरूपात पैसे उकळणाऱ्या मंडळाच्या अध्यक्षाविरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२८ ऑगस्ट रोजी नवयुवक मित्र मंडळाचे अध्यक्ष राहुल उपाध्याय हा मंडळाच्या इतर पदाधिकाऱ्यांसह रामप्रकाश सहानी यांच्या मोबाईलच्या दुकानात आला आणि ५ हजार गणपतीची वर्गणी मागू लागला. मात्र, दुकानदाराने ५ हजार रुपये वर्गणी जास्त मागत असल्याने त्याने देण्यास नकार दिला. त्यावर मंडळाचे उपाध्यक्ष राहुल आणि त्याच्या सहकाऱ्यांनी रामप्रकाश यांच्याकडून बळजबरीने ११०० रुपये घेतले. तसेच आता तुला ५० हजार रुपये वर्गणी द्यावी लागणार असून ते नाही दिल्यास परिसरात धंदा करू देणार नसल्याचं मंडळाच्या अध्यक्षाने रामप्रकाशला धमकावलं. ३१ ऑगस्टला पुन्हा राहुल हा रामप्रकश यांच्या दुकानावर आला आणि धमकावू लागला. त्यानंतर मात्र, रामप्रकश यांना मोबाईलवर आलेला धमकीचा कॉल त्यांनी रेकॉर्ड केला आणि पोलिसात जाऊन ऐकविला. दरम्यान रामप्रकशने गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.