मुंबई - केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) पदाचा गैरवापर करत कर्ज दिल्याप्रकरणी चंदा कोचरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच व्हिडीओकॉन कर्ज प्रकरणी देखील सीबीआयने नरिमन पॉईंट, वांद्रे - कुर्ला संकुलसह (बीकेसी) मुंबईतील चार ठिकाणी आणि औरंगाबाद येथे छापेमारी केली आहे. व्हिडीओकॉन आणि सुप्रीम एनर्जीच्या कार्यालयांवर हे छापे टाकण्यात आले आहेत.
चंदा कोचर यांना कर्ज प्रकरण भोवलं आणि ICICI Bank च्या पदावरून पायउतार व्हावं लागलं होतं. कोचर या बँकेच्या कार्यकारी संचालक आणि सीईओ होत्या. व्हिडीओकॉन कंपनीला दिलेल्या कर्जाचं प्रकरण त्यांना भोवलं आहे. हे कर्ज देताना कोचर यांनी व्यक्तिगत हित बघितलं आणि त्याचा फायदा घेतला असा त्यांच्यावर आरोप होता. जून महिन्यापासून त्या सक्तीच्या रजेवर होत्या. बँकेच्या संचालक मंडळाचा आणि शेअर धारकांचा दबाव असल्याने शेवटी त्यांनी संचालक मंडळाकडे निवृत्तीचा अर्ज केला आणि सर्व पदांचे राजीनामे देत असल्याच कळवलं होतं. मंडळानं तातडीनं त्यांची विनंती मान्य केली आणि त्यांना सर्व जबाबदारीतून मुक्त केलं.
चंदा कोचर यांनी व्हिडीओकॉन कंपनीला 3250 कोटींचं कर्ज नियमबाह्य पद्धती दिलं होतं. नंतर व्हिडीओकॉन कंपनीने ते कर्ज बुडवलं. ही माहिती बाहेर आल्यानंतर कोचर यांच्या कार्यपद्धतीवर आणि हेतूवरच टीका होऊ लागली. कोचर यांनी कुठलीही काळजी न घेता किंवा खात्री न करता एवढं मोठं कर्ज दिलच कसं असे प्रश्न विचारण्यात येवू लागले. नंतर चौफेर टीका होऊ लागल्याने त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं. चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या Nu-power या कंपनीला व्हिडीओकॉनकडून दोन कोटी रूपये देण्यात आले होते अशी माहिती पुढे आल्यानं हे कर्ज नेमकं कशासाठी दिलं होतं असे प्रश्न विचारले जावू लागले.