मुंबई : बेकायदा कर्ज वितरण केल्याप्रकरणी गोत्यात आलेल्या आयसीआयसीआय बॅँकेच्या माजी कार्यकारी संचालिका व मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांच्या अडचणी आणखी वाढण्याच्या शक्यता आहेत. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) त्यांच्यासह पती दीपक कोचर यांच्या मालकीची ७८ कोटींची मालमत्ता शुक्रवारी जप्त केल्यानंतर, त्यांना पुन्हा चौकशीसाठी पाचारण करण्याचे ठरविले आहे.
आवश्यकतेनुसार त्यांना चौकशीसाठी बोलाविण्यात येणार असल्याचे ईडीतील सूत्रांकडून सांगण्यात आले. आयसीआयसीआय बॅँकेकडून काही उद्योगपतींना बेकायदा करण्यात आलेला कर्जपुरवठा व त्याच्या वसुलीमध्ये दिरंगाई केल्याप्रकरणी चंदा कोचर यांच्यावर मनी लॉड्रिंगअंतर्गत गुन्हे दाखल करून ईडीकडून कारवाई सुरू आहे. शुक्रवारी त्यांचे मुंबईतील μलॅट, पती दीपक कोचर यांचे कंपनीचे कार्यालय व तामीळनाडू येथील मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. दोघांची बॅँक खाती आणि त्यावर झालेल्या व्यवहाराबाबतकसून तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
चंदा कोचर हिने अधिकाराचा गैरवापर करीत व्हिडीओकॉन समूह आणि अन्य कंपन्यांना नियमबाह्यपणे दिलेले हजारो कोटीचे कर्ज, त्याच्या वसुलीत दिरंगाई आणि दीपक कोचर यांच्या न्यू पॉवर रिन्यूएबल्स या कंपनीचे वेणूगोपाल धूत यांच्या कंपनीशी भागीदारी असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कर्ज प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवत, त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार व फसणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गेल्या वर्षी चंदा कोचर यांच्याकडे चौकशी करण्यात आली आहे. मात्र, जप्तीनंतर गैरव्यवहाराप्रकरणी आणखी काही बाबी समोर आल्या असून, त्याबाबत त्यांच्याकडे लवकर चौकशी केली जाईल, असे ईडीतील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.