मुंबई - व्हिडीओकॉन कर्ज प्रकरणात दोषी आढळलेल्या चंदा कोचर यांच्याविरोधात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) लूकआऊट नोटीस जारी केली आहे. चंदा कोचर यांना देश सोडून जाण्यास सीबीआयने मनाई केली आहे. सीबीआयने सर्व विमातळांवरील इमिग्रेशन विभागाला चंदा कोचर यांनी देश सोडून जाण्याचा प्रयत्न केल्यास तशी माहिती कळवा असे देखील सांगितल्याची माहिती मिळाली आहे.
चंदा कोचर यांच्यावर सीबीआयने 22 जानेवारी रोजी गुन्हा दाखल केला होता. पदाचा गैरवापर करत आपल्या मर्जीतील लोकांना कर्ज देऊन आर्थिक फायदा करून दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. यात चंदा कोचर, वेणूगोपाल धूत यांच्यासह इतर पाचजणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. व्हिडीओकॉन कर्ज प्रकरणात चंदा कोचर दोषी ठरल्या असून त्यांच्यावर बँकेच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. आयसीआयसीआय बँकेच्या अंतर्गत चौकशी समितीने हा निष्कर्ष काढला. चंदा कोचर या आयसीआयसीआय बँकेत सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक पदावर होत्या. त्यावेळी आयसीआयसीआय बँकेने वेणुगोपाल धूत यांच्या व्हिडीओकॉन समूहाला 3,250 कोटींचे कर्ज दिले. त्याबदल्यात धूत यांनी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या कंपनीत 64 कोटी रुपये गुंतवल्याचा आरोप होता.