चंडीगढ जिल्हा कोर्टाने १४ वर्षीय मुलाच्या लैंगिक शोषणाच्या आरोपात एका महिला शिक्षिकेला १० वर्ष तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कोर्टाने दोषी शिक्षिकेवर १० हजार रूपये आर्थिक दंडही ठोठावला आहे. पीडित मुलगा शिक्षिकेकडे ट्यूशनसाठी जात होता. यादरम्यान महिलेने अनेकदा मुलाचं लैंगिक शोषण केलं. मुलाच्या आई-वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी कारवाई केली.
आरोपी महिलेला चंडीगढ पोलिसांनी २४ मे २०१८ ला अटक केली होती. मुलाने एका एनजीओकडून करण्यात आलेल्या काउन्सेलिंगमध्ये महिला शिक्षिकेच्या कृत्याबाबत खुलासा केला. त्यानंतर त्याच्या आई-वडिलांनी पोलिसाता जाऊन महिलेविरोधात तक्रार दिली होती. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शिक्षिका आणि मुलाच्या परिवारातील लोक परिचयाचे होते.
पीडित मुलगा आणि त्याची बहीण सप्टेंबर २०१७ पासून आरोपी महिलेकडे कोचिंगसाठी जात होते. पोलिसातील तक्रारीनुसार, महिलेने मुलाच्या आई-वडिलांना मुलीला वेगळ्या ट्यूशनमध्ये पाठवण्यास सांगितले होते. यासाठी तिने कारण दिलं होतं की ती असं केल्याने त्यांच्या मुलाच्या अभ्यासावर व्यवस्थित लक्ष देऊ शकेल. जेव्हा आई-वडिलांनी मुलगा आणि मुलीला वेगवेगळ्या ट्यूशनमध्ये पाठवण्यास सुरूवात केली तेव्हा महिला शिक्षिकेने मुलाचं लैंगिक शोषण सुरू केलं.
मार्च २०१८ मध्ये पीडित मुलाच्या आई-वडिलांनी आपल्या मुलाची ट्यूशन बंद केली. यामुळे नाराज झालेल्या महिलेने या मुलाला त्याच्या आई-वडिलांच्या उपस्थितीत आणि आपल्या पतीच्या उपस्थितीत एका रूममध्ये बंद केलं होतं. मुलाला शेजाऱ्यांच्या मदतीने कसंतरी महिलेच्या तावडीतून सोडवण्यात आलं होतं. याप्रकरणी चंडीगढ कोर्टाने कारवाई करत महिलेला १० वर्षांची तुरूंगवासाची शिक्षा सुनावली.