चंदीगड - चंदीगड जिल्हा न्यायालयाने एका महिला शिक्षिकेला 14 वर्षांच्या मुलाचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने दोषी शिक्षिकेला 10 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. पीडित मुलगा ट्यूशनसाठी शिक्षिकेकडे जात होता. यादरम्यान शिक्षिकेने अनेक वेळा मुलाचे लैंगिक शोषण केले. याप्रकरणी मुलाच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.
चंदीगड पोलिसांनी आरोपी महिलेला 24 मे 2018 रोजी अटक केली होती. एका एनजीओने केलेल्या समुपदेशनात मुलाने महिला शिक्षिकेचा हा संपूर्ण प्रकार उघडकीस आणला होता. यानंतर, त्याच्या पालकांनी आरोपी महिलेविरुद्ध पॉक्सो कायद्याच्या कलम-6 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शिक्षिका आणि मुलाचे कुटुंबीय एकमेकांना चांगल्या पद्धतीने ओळखत होते.
पीडित अल्पवयीन मुलगा आणि त्याची बहीण सप्टेंबर 2017 पासून आरोपी महिलेकडे कोचिंगसाठी जात होत्या. पोलिसात नोंदवण्यात आलेल्या तक्रारीनुसार, महिलेने मुलाच्या पालकांना त्यांच्या मुलीस स्वतंत्रपणे शिकवणीसाठी पाठविण्यास सांगितले होते. तसेच, यामुळे तिला त्यांच्या मुलाच्या अभ्यासावर योग्य प्रकारे लक्ष देता येईल, असेही तिने म्हटले होते. यानंतर मुलाच्या पालकांनी जेव्हा त्यांच्या मुलाला आणि मुलीला स्वतंत्रपणे ट्यूशनला पाठविण्यास सुरुवात केली, तेव्हा शिक्षिकेने संबंधित मुलाचे लैंगिक शोषण करण्यासही सुरुवात केली.
पीडित मुलाच्या पालकांनी मार्च 2018 मध्ये मुलाचे ट्यूशन बंद केले. याचा राग येऊन आरोपी महिलेने मुलाला त्याचे आई-वडील आणि पती यांच्या उपस्थितीतच एका रूममध्ये बंद केले. यानंतर, शेजाऱ्यांच्या मदतीने मुलाला संबंधित महिलेच्या तावडीतून सोडविण्यात आले. या प्रकरणाची सुनावणी करताना चंदीगड जिल्हा न्यायालयाने महिलेला 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली असून 10 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.