अलिबाग : बहिणीला घटस्फोट देण्यासाठी दहा लाखाची पोटगी मागितल्याचा राग मनात ठेवून आरोपी विजय शेट्टी याने मेव्हण्याच्या डोक्यात गोळी मारून निर्घृण खून केल्याची घटना २१ ऑगस्ट रोजी कोलाड तिसे येथील रेल्वे गेटवर घडली होती. या गुन्ह्यातील आरोपी विजय शेट्टी हा या घटनेनंतर फरार झाला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने शेट्टी याला अक्कलकोट येथून १७ सप्टेंबर रोजी अटक केली. आरोपीला रोहा न्यायालयात हजर केले असता २३ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. आरोपी कडून दोन गावठी पिस्तूल मॅग्झीन, १८ काडतुसे आणि एक रिकामी पुंगळी गुन्ह्यात वापरलेल्या मोटार सायकल हा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपी विजय शेट्टी याने याआधी दोन दुहेरी हत्याकांड गुन्हे केले आहेत.
चंद्रकांत कांबळे हत्येप्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सोमवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन आरोपी अटक बाबत माहिती दिली. अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, रोहा उपविभागीय अधिकारी सोनाली कदम, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यावेळी उपस्थित होते.
चंद्रकांत कांबळे हे रेल्वे विभागात वॉच मन म्हणून कोलाड तीसे येथील रेल्वे गेटवर कार्यरत होते. २१ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास त्याची गोळी मारून हत्या झाल्याची घटना घडली. त्यानंतर कांबळे यांच्या हत्येचा तपास लावण्याचे आव्हान जिल्हा पोलिसांना होते. मयत कांबळे हे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असल्याने पोलिसांकडे आरोपी पकडण्याचा दबाव वाढत होता. रायगड पोलिसाची सात पथके आरोपीचा वेगवेगळ्या मार्गाने तपास करीत होते. कांबळे यांच्या बहिणीचा नवरा विजय शेट्टी हा या प्रकरणात असल्याचे समोर आले. त्यानुसार रोहा येथे शेट्टी यांच्या घराचीं झडती घेतली असता गुन्ह्याबाबत कागदपत्रे मिळाली. त्यामुळे शेट्टी हाच आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. मात्र आरोपी हा फरार असल्याने त्याचा शोध पोलिसांनी सुरू केला.
आरोपी विजय शेट्टी हा मोबाईल वापरत असला तरी त्याचा वापर कमी असल्याने शोध घेणे अवघड जात होते. विजय याने याआधी १९९० साली आपल्या बहिणीचा नवरा आणि त्याच्या भावाची चाकूने हत्या केली होती. तर उरण येथे १९९९ साली एबिजे कंपनीचे मॅनेजर आणि चालकाची गोळ्या घालून हत्या केली होती. दोन्ही गुन्ह्यात त्याने दीड वर्ष शिक्षा भोगली होती. मात्र त्यातून तो निर्दोष सुटला होता. रायगड पोलिसांनी आरोपी अटक असताना कोणाशी संपर्कात होता याची माहिती घेतली. तर काही दिवसापूर्वी अलिबाग मध्ये येऊन आपल्या मित्राला भेटून गेल्याची माहिती स्थानिक गुन्हे पथकाला लागली. त्यानुसार पथक हे अक्कलकोट येथे पोहचले. स्वामी समर्थ मंदिर परिसरात टेहळणी करून कौशल्यपूर्ण व शिताफीने ताब्यात घेवून कोलाड याठिकाणी आणून अटक केली आहे.
सदारची कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलिस निरीक्षक नागेश कदम, पोलिस उप निरीक्षक धनाजी साठे, पोलिस उप निरीक्षक विकास चव्हाण, पोलिस उप निरीक्षक विशाल शिर्के आणि स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार एएसआय प्रसाद पाटील, दीपक मोरे, पोलिस हवालदार संदीप पाटील, सुधीर मोरे, प्रसन्न जोशी, यशवंत झेमसे, अमोल हंबीर, प्रतीक सावंत, श्यामराव कराडे, जितेंद्र चव्हाण, सुदीप पहेलकर, राकेश म्हात्रे, विकास खैरणार, रुपेश निगडे, पोलिस नाईक विशाल आवळे, सचिन वावेकर, पोलिस शिपाई ईश्वर लंबोटे, भरत तांदळे, बाबासो पिंगळे, अक्षय सावंत, अक्षय जगताप, ओंकार सोंडकर, मोरेश्वर ओंबळे, लालासो वाघमोडे, स्वामी गावंड, रुपेश पाटील सायबर पोलिस ठाणेचे तुषार घरत, अक्षय पाटील. यांनी या गून्हयाचे तपासात उत्कृष्ट कामगिरी केली आहे.