उत्तर प्रदेशातील फतेपूरमध्ये एका विवाहित हिंदू मुलीची दुसऱ्या धर्माच्या तरुणाने फसवणूक, अपहरण आणि बलात्कार केल्याच्या आरोप लावण्यात आला आहे. नाव बदलून युवकानं प्रेमाच्या जाळ्यात अडकवल्याचा आरोप एका २१ वर्षीय युवतीने केलाय. त्यानंतर एके दिवशी भेटण्याच्या बहाण्याने बोलावून युवतीचं अपहरण करून तीन दिवस तिच्यावर बलात्कार केल्याचं समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी कुठेच न सापडल्याने नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात जाऊन हरवल्याची तक्रार दाखल केली. तातडीने कारवाई करत पोलिसांना मुलीचे अपहरण झाल्याचे समजले. पोलिसांच्या पथकाने विविध ठिकाणी छापे टाकून मुलीला शोधून काढले, पोलिसांनी मुलीला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. त्याचवेळी मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली.
पीडित तरुणीने आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यावर पुढील कार्यवाही सुरू आहे. पीडितेने पोलिसांना सांगितले की, दोन महिन्यांपूर्वी तिच्या मोबाईलवर एका तरुणाचा फोन आला होता. आपले नाव सोनू सिंग असे सांगताना या तरुणाने तो क्षत्रिय कुटुंबातील असल्याचे सांगितले. त्यानंतर ती त्याच्याशी फोनवर बोलू लागली. प्रेमात पडल्यानंतर १४ डिसेंबर रोजी प्रियकराने तिला विश्वासात घेऊन एका ठिकाणी भेटायला बोलावले.
तेथून तो मुलीला एका घरात घेऊन गेला. त्या घरात गेल्यावर तिच्या प्रियकराचं नाव सोनू सिंग नसून सलीम असल्याचं मुलीला समजले, तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने याला विरोध केला असता सलीमने तिला ओलीस ठेवले आणि जबरदस्तीने धर्मांतर करण्यास भाग पाडून लग्न करण्यास सांगितले. मुलीने नकार दिल्याने त्याने तीन दिवस तिच्यावर बलात्कार केला. दुसरीकडे, या प्रकरणाची भनक लागताच हिंदुत्ववादी संघटनेचे काही लोकही पोलिस ठाण्यात पोहोचले. मुलीने आपल्यावर झालेल्या गुन्ह्याची कहाणी सर्वांसमोर सांगितली. हिंदुत्ववादी संघटनेच्या लोकांनी आरोपीवर कडक कारवाईची मागणी केली.
युवती आधीच विवाहितपोलिसांनी सांगितले की, पीडितेचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. तिला दोन वर्षांचा मुलगाही आहे.पण सासरच्या छळाला कंटाळून ती माहेरी राहत होती. पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी सलीमविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपींची चौकशी सुरू आहे. पीडितेची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली आहे. अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असं पोलीस अधिकारी लालौली रवींद्र श्रीवास्तव यांनी सांगितले.