लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुख्यात गुंडांच्या दोन गटात सुरू असलेल्या वादाचा भडका उडाल्यामुळे रविवारी रात्री बंगाली पंजा भागात फायरिंग, हाणामारी आणि तोडफोडीची घटना घडल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, या घटनेमुळे बंगाली पंजा भागात रविवारी रात्रीपासून निर्माण झालेला तणाव सोमवारी दिवसभर तसाच होता.पोलिसांच्या तपासात उघड झालेल्या माहितीनुसार. कुख्यात वसीम चिऱ्या टोळीचा गुंड मोहसीन रविवारी रात्री एका साथीदारासह मस्कासाथ भागात गेला होता. तेथे त्याच्या विरोधी गटातील अवेजने मोहसीनची बेदम धुलाई केली. मोहसीन आणि त्याचा साथीदार तेथून कसाबसा सटकला. त्याने वसीम चिºयाला हा प्रकार सांगितला. त्यामुळे रात्री ११ च्या सुमारास शांतिनगर, लकडगंज भागातून वसीम चिरा, तर जाफरनगरातून शेख दानिश, मोहसीन अकोलाचा भाऊ, वसीम दोसा, शेख अस्सू, सानू मोमिनपुरा त्याच्या २० ते २५ साथीदारांसह तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बंगाली पंजा भागात धडकले. त्यांच्याकडे तलवार, चाकू, रॉड, दंडुके, गुप्ती असे घातक शस्त्र होते तर, कुख्यात वसीम चिराजवळ पिस्तूल होते. त्यांनी अवेजच्या घराजवळ येऊन आरडाओरड शिवीगाळ सुरू केली. कॉर्पोरेशन शाळेजवळ राहणारे गुलाम रसूल जमाल पोटीयावाला (वय ४७) यांना शिवीगाळ करून ‘आज तेरा गेम करना है’ असे म्हणत त्यांच्या दिशेने पिस्तुलातून फायर केले. गुलाम आडवेतिडवे पळत सुटल्याने त्यांना गोळी लागली नाही. त्यानंतर आरोपींनी परिसरात तोडफोड सुरू केली. त्यांच्या दोन दुचाकी, एक नॅनो कार तसेच परिसरातील नागरिकांच्या सुमारे १५ ते २० वाहनांची तोडफोड केली. बंगाली पंजा चौकातील इरफानच्या भावाचा भोलाशहा पान महल आहे. त्याचीही आरोपींनी तोडफोड केली. पुढे जाऊन वसीम चिºयाने आणखी चार फायर केले. या प्रकारामुळे परिसरात प्रचंड दहशत आणि तणाव निर्माण झाला. माहिती कळताच तहसील ठाण्याचा पोलीस ताफा तसेच पाचपावली आणि लकडगंजमधील गस्ती पथक, गुन्हे शाखेचे पोलिसही पोहचले. पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर यांनीही धाव घेतली. पहाटे ५ वाजेपर्यंत पोलिसांनी आरोपींची शोधाशोध केली, मात्र एकही आरोपी पोलिसांच्या हाती लागला नाही.पोलिसांना आव्हान !मोहसीन अहमद ऊर्फ भुऱ्या मुस्ताक अहमद आणि त्याचा भाऊ दानिश हे कुख्यात गुन्हेगार आहेत. दानिशला यापूर्वी पोलीस उपायुक्त माकणीकर यांनी हद्दपारही केले. मात्र, तो नागपुरातच राहतो आणि गुन्हेगारीतही सक्रिय असल्याचे या प्रकरणातून उघड झाले आहे. वसीम चिऱ्या तसेच त्याचा प्रतिस्पर्धी कुख्यात तिरुपती या दोघांमध्ये चार ते पाच वर्षांपूर्वी असेच टोळीयुद्ध झाले होते. वसीम आणि तिरुपतीने तब्बल अर्धा तास सिनेस्टाईल एकमेकांवर फायरिंग केले होते. त्यावेळी पोलिसांनी या दोन्ही गुंडांच्या टोळ्यांची गचांडी पकडून त्यांना थंड करण्यात यश मिळवले होते. आता परत वसीमने फायरिंग करून आपला दबदबा निर्माण करण्याचे प्रयत्न चालवितानाच पोलिसांनाही आव्हान दिले आहे.पोलीस आयुक्तांकडून गंभीर दखलपोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी गंभीर दखल घेतली असून, कायदा व सुव्यवस्थेची वाट लावू पाहणाऱ्या या गुंडांची नांगी ठेचण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर, पोलीस पथके दिवसभर दोन्ही गटातील गुंडांची शोधाशोध करीत होते. वसीमचा एक साथीदार शानू तहसील पोलिसांच्या सोमवारी सायंकाळी हाती लागला. वृत्त लिहिस्तोवर त्याची चौकशी सुरू होती.
नागपुरात कुख्यात वसीम चिऱ्या टोळीचा हैदोस : प्रचंड दहशत, तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 10:19 PM
कुख्यात गुंडांच्या दोन गटात सुरू असलेल्या वादाचा भडका उडाल्यामुळे रविवारी रात्री बंगाली पंजा भागात फायरिंग, हाणामारी आणि तोडफोडीची घटना घडल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, या घटनेमुळे बंगाली पंजा भागात रविवारी रात्रीपासून निर्माण झालेला तणाव सोमवारी दिवसभर तसाच होता.
ठळक मुद्दे२५ ते ३० सशस्त्र गुंडांचा धुमाकूळ : पाच गोळ्या झाडल्या : १५ ते २० वाहनांची तोडफोड : पानटपरीही फोडली