मुंबई - सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करून चारकोप येथे पती - पत्नींकडून खंडणी उकळणाऱ्या दोघांना एच. एम. बी. कॉलनी पोलिसांनी अटक केली. अश्विनी शर्मा आणि साजिद वरेकर अशी या अटक तोतया सीबीआय अधिकाऱ्यांची नावे असून त्यांनी इनोव्हा कार आणि ५० लाख रुपये उकळल्याचे उघड झाले आहे. अश्विन हा मूळचा पानिपत, हरियाणा आणि साजिद हा ठाण्यात राहणारा आहे.
चारकोप येथे एलआयसी एजंट म्हणून काम करणारे फिर्यादी आणि त्यांची पत्नी राहतात. हे दोघे पती-पत्नी सांभाळत असलेल्या पतपेढीमध्ये घोटाळा झालेला आहे. तो मिटविण्यासाठी एक कोटी रुपये द्यावे लागतील असे अश्विनी शर्मा आणि साजिद वरेकर यांनी या दोघांना बतावणी केली. जर पैसे दिले नाहीतर तर खोट्या केसमध्ये अडकवून तुमचा एन्काउंटर करू अशी धमकी या तोतया सीबीआय अधिकाऱ्यांनी दिली. नंतर घाबरलेल्या फिर्यादी दाम्पत्याने तीन हफ्त्यामध्ये ५० लाख रुपये रोख या दोघांना दिले. तसेच त्यांची इनोव्हा कारही (एमएच ४७, जी ८६९) शर्मा आणि वरेकर यांनी हडपली. परिमंडळ - ११ चे उपायुक्त संग्रामसिंग निशानदार यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेत एच. एम. बी. कॉलनी पोलिसांचे एक पथक स्थापन केले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंडित ठाकरे आणि निरीक्षक भाऊसाहेब आहेर यांच्या मार्गदर्शनखाली पथकाने फिर्यादी दाम्पत्याकडून दुसरी इनोव्हा कार घेण्यासाठी आलेल्या शर्मा आणि वरेकर यांना रंगेहाथ जेरबंद केले. पोलिसांनी त्यांच्याकडून ७५ लाख हस्तगत केले. तसेच चौकशीमध्ये अश्विनी शर्माच्या विरोधात पाच फसवणुकीचा गुन्हा तर साजिद वरेकरच्या विरोधात फसवणुकीचा एक गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.