सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरातील एका शिधावाटप दुकानदाराने तांदूळ व गव्हाचे वाटप गोर गरीब नागरिकांना न करता, काळ्या बाजारात विकल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी ज्योती ढकोलिया व रिशी रजनीश ढकोलिया यांच्यावर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला.उल्हासनगर कॅम्प नं-४, ओटी सेक्शन भागात ४० एफ, २७३ क्रमांकाचे शिधावाटप दुकान आहे. दुकानदार ज्योती ढकोलिया व रिशी ढकोलिया यांनी संगनमत करून शासनाने गोरगरीब नागरिकांना वाटण्यासाठी पाठविलेले तांदूळ व गहू परस्पर काळ्या बाजारात नफा कामविण्याच्या उद्देशाने विक्री केली. शासन शिधावाटप दुकानातील अन्नधान्य गोरगरीब नागरिकांना न वाटता काळ्या बाजारात विकल्याचा माहिती शिधावाटप अधिकारी शशिकांत पाटसुते यांना मिळाल्यावर, त्यांनी बुधवारी दुपारी ४ वाजता दुकानाची झाडाझडती घेतली. तेंव्हा गोरगरीब नागरिकांना शासनाकडून वाटप करण्यासाठी आलेला तांदूळ व गहू गायब होता. अखेर शिधावाटप अधिकारी शशिकांत पाटसुते यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ चे कलम ३,७,८(२) राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा २०१३ मधील तरतुदी (५) अंतर्गत गुन्हा दाखल केला.शहरातील अनेक शिधावाटप दुकाने वादात सापडली असून शासनाकडून गोरगरीब जनतेसाठी आलेले अन्नधान्य स्वतःच्या फायद्यासाठी काळ्या बाजारात विकत असल्याची चर्चा होत आहे. तसेंच बहुतांश दुकानाच्या वजनात पाप दडल्याचे बोलले जात असून वजन मापे कार्यालयाच्या वतीने अनेक दुकानावर यापूर्वी वजनकाटे खोटे असल्याचा ठपका ठेवून गुन्हे दाखल केली. मात्र काही वर्षांपासून अशी कारवाई वजन मापे कार्यालयाकडून होत नसल्याने, आश्चर्य व्यक्त होत आहे. शासनाने पाठविलेले अन्नधान्य नागरिकांना मिळते का? याचे सर्वेक्षण केल्यास, अनेक शिधावाटप दुकानदार गजाआड जाण्याची शक्यता आहे. शिधावाटप अधिकाऱ्यांनी एका दुकानावर कारवाई करून गप्प न बसता इतर दुकानावर कारवाई करून गोरगरीब नागरिकांना न्याय द्यावा. अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे.