मुंबई : साकीनाका येथील बलात्कार, हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण करत अवघ्या १८ दिवसांत आरोपी मोहन चौहानविरोधात ३४६ पानांचे दोषारोपपत्र दिंडोशी सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. यात ७७ साक्षीदारांच्या जबाबांची नोंद करण्यात आली असल्याची माहिती मुंबई पोलीस प्रवक्ते चैतन्या एस. यांनी दिली आहे.
साकीनाका येथील खैरानी रोड परिसरात ९ सप्टेंबरच्या मध्यरात्री ३२ वर्षीय महिलेवर चौहान याने क्रूरपणे अत्याचार केले होते. याप्रकरणी बलात्कार, हत्या, अनैसर्गिक अत्याचारासह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता.
हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा आणि पोलिसांना पुरावे जमा करण्यात मदत व्हावी, यासाठी ॲड. राजा ठाकरे यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. साकीनाका पोलिसांनी १० सप्टेंबरला चौहानला बेड्या ठोकल्यानंतर त्याने गुन्ह्यांची कबुलीही दिली होती.