लोकमत न्यूज नेटवर्कनवीन पनवेल : खरोशी येथील केळंबा देवीची दानपेटी चोरी करून जामिनावर सुटलेल्या चोरट्याने पनवेल तालुक्यातील आपटाफाटा येथील मंदिरात १ ऑक्टोबर रोजी चोरी केली होती. त्याला चिखलाने माखलेल्या पायाच्या ठशांवरून अटक केल्याची माहिती पनवेल तालुका पोलिसांनी शनिवारी दिली.
१ ऑक्टोबर रोजी स्वामी समर्थ मंदिर, साई हरिक्षेत्र, आपटाफाटा या मंदिराच्या गाभाऱ्याचा दरवाजा तोडून आतील स्टीलची दानपेटी चोरून बाहेरील संगमरवराची दानपेटी तोडून त्यातील भाविकांनी दान केलेली रोख रक्कम घरफोडी करून नेली होती, तसेच बाजूला राहणारे मंदिराचे विश्वस्त अंजली मिलिंद मुणगेकर यांच्या घराच्या मागील दरवाजाचा कडीकोयंडा तोडून कपाटात ठेवलेले देवीचे वापरातील ५ तोळे वजनाचे अडीच लाख रुपये किमतीचे दागिने घरफोडी चोरी करून नेल्याबाबत पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला होता.
पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक अविनाश पाळदे व पथकाने सुरू केला असता सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी हा चेहऱ्याला काळे कापड बांधून अंगावर फक्त हाफ पॅन्ट व दानपेटी घेऊन जाताना दिसत होता. तो नदीकिनारी असलेल्या चिखलातून गेल्यामुळे आरोपीच्या डाव्या पायाच्या ठळक पाऊलखुणा दिसत होत्या व उजव्या पायाचे पाऊलखुणा स्पष्ट दिसत नव्हत्या. यावरून आरोपी हा एका पायाने लंगडत चालणारा असावा व मुख्य रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी दिसत नसल्याने तो नदी पार करून पलीकडील पेण तालुक्यातील आदिवासी पाड्याच्या दिशेने गेला असावा असा निष्कर्ष पोलिसांनी काढला.
यावरून गुप्त बातमीदारामार्फत पेण तालुक्यातील आदिवासी पाडे, तसेच इतर परिसरात अशा वर्णनाचा व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीचा पोलिसांनी शोध घेतला असता खैरासवाडी, पो. जिते, ता. पेण, येथे अशा वर्णनाची एक व्यक्ती राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली; परंतु तो सध्या पेण पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यात अटक असल्याचे समजले.
दागिने, रक्कम जप्तयाबाबत पेण पोलीस ठाण्यातील गुन्हेगारी अभिलेख तपासता ही व्यक्ती दोन दिवसांपूर्वी कारागृहातून सुटल्याची माहिती मिळाली. तो एका पायाने लंगडत चालत असल्याचे पेण पोलिसांकडून कळाले. यावरून गुन्हा त्यानेच केला असल्याची खात्री झाल्याने त्याच्या राहत्या घराच्या परिसरात सापळा लावून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीत गुन्हा केल्याची कबुली दिली. गुरुनाथ तुकाराम वाघमारे, रा. खैरासवाडी, पो. जिते, पेण असे आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून घरफोडी करून नेलेले ५० ग्रॅम वजनाचे दोन लाख ५० हजारांचे सोन्याचे दागिने, तसेच पाच हजार रोख रक्कम असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.