मुंबई: चर्नीरोड येथील शासकीय वसतिगृहाच्या खोलीत १८ वर्षीय तरुणीचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना ५ जून रोजी समोर आली. सुरक्षा रक्षकानेच तरुणीवर बलात्कार करत तिची गळा दाबून हत्या केल्याची माहिती तपासात समोर आली. हत्येनंतर सुरक्षा रक्षकाने लोकल समोर येत आयुष्य संपविले होते. याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी सुरक्षा रक्षक ओमप्रकाश कनोजिया विरुद्ध हत्येसह बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणात आता नवीन अपडेट समोर आली आहे.
सदर प्रकरणाताील पीडित तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं फॉरेन्सिक अहवालात स्पष्ट झालं आहे. ओमप्रकाश कनोजियाच्या हाडाचे डीएनए नमुने पीडितेच्या नखांवरून मिळालेल्या डीएनए नमुन्याशी जुळले आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे. आरोपीने तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मुलीने प्रतिकार केला होता, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
मूळची अकोला येथील रहिवासी असलेली १८ वर्ष २ महिन्याची तरुणी सावित्रीबाई फुले वसतीगृहात राहण्यास होती. तिचे वडील पत्रकार आहे. ती वांद्रे येथील एका नामांकित कॉलेज मध्ये पॉलिटेक्निकलच्या दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत होती. ५ जून सायंकाळी ५ च्या सुमारास तीचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह वसतीगृहाच्या चौथ्या मजल्यावरील खोलीत सापडला. या घटनेने वसतीगृहात एकच खळबळ उडाली होती. तसेच या प्रकरणामुळे वसतिगृहातील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुंबईत मुली सुरक्षित नाहीत का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
वडिलांचा कॉल अन्...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीचे वडील सकाळपासून मुलीला कॉल करत होते. मात्र, मुलगी फोन घेत नसल्याने त्यांनी मैत्रिणीकडे विचारणा केली. त्यांनी मुलीचा शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही. दरवाजाही बाहेरून लॉक होता. ५ जून रोजी सायंकाळी ४ ते ५ च्या सुमारास पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी दरवाजाचा लॉक तोडून प्रवेश केला. तेव्हा मुलीचा मृतदेह मिळून आला. मुलगी पॉलिटेक्निकलच्या दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत होती.
सुरक्षा रक्षकाची आत्महत्या-
आरोपी सुरक्षा रक्षक कनोजीयाने सकाळी ६ वाजता चर्नीरोड स्थानका दरम्यान लोकल समोर येत आत्महत्या केली. पोलिसांनी आत्महत्येचे सीसीटिव्ही ताब्यात घेतले आहेत. त्याच्या वडिलांनीही त्याचा मृतदेह ओळखला आहे. त्याच्या खिशात दोन चावी मिळून आल्या आहेत.