पुणे : लष्कर भागात रस्त्याच्या कडेला लावलेली मोटार चोरुन पळून गेलेल्या चोरट्याला गस्त घालणार्या पोलिसांनी पाठलाग करुन पकडले. मोटारीतील जीपीएस यंत्रणेवरुन पोलीस चोरट्यापर्यंत काही वेळातच पोहचले. अभिषेक ऊर्फ पप्पू पवार (वय २८) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.
तक्रारदाराने लष्कर भागात मोटार पार्क केली होती. काही वेळानंतर ते तेथे आल्यावर त्यांना मोटार दिसली नाही. तक्रारदाराने तातडीने पोलिसांकडे धाव घेतली. त्यावेळी लष्कर भागात पोलीस कर्मचारी वैभव हिलाल आणि संग्राम पाटील गस्त घालत होते. त्यांनी तक्रारदारांशी संपर्क साधला.
मोटारीमध्ये जीपीएस यंत्रणा असल्याची माहिती मिळाल्यावर वैभव हिलाल आणि संग्राम पाटील हे तक्रारदाराला बरोबर घेऊन जीपीएस यंत्रणेद्वारे मोटारीचा मागोवा घेऊ लागले. तेव्हा मोटार पूलगेट परिसरातील एका छोट्या गल्लीत गेल्याची माहिती मिळाली. तिघेही तातडीने तिकडे गेले. तक्रारदाराने त्यांची मोटार क्रमांकावरुन ओळखली.
हिलाल आणि पाटील यांनी मोटार चोरट्याचा पाठलाग सुरु केला. काही अंतरावर मोटारचोराला पकडले. मोटार चोरीचा गुन्हा काही वेळात उघडकीस आणणारे पोलीस कर्मचारी हिलाल व पाटील यांनी दाखविलेल्या तत्परतेचे पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी कौतुक केले. त्यांच्या कामगिरीबद्दल बक्षीस देऊन गौरव करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.