लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पेणमधील व्यावसायिकाला स्वस्तात सोन्याची बिस्किटे देण्याच्या नावाखाली गंडविल्याची घटना मानखुर्दमध्ये उघडकीस आली आहे. व्यावसायिकाचे साडेतीन लाख रुपये घेऊन चोरांनी पळ काढला आहे. याप्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून मानखुर्द पोलिस अधिक तपास करत आहेत.
मूळचे पेणचे रहिवासी असलेल्या सुलतान (३१) यांचा गादी विक्रीचा व्यवसाय आहे. शेजारी राहणाऱ्या रेती डंपर व्यावसायिकाकडून त्याच्या झारखंडच्या कामगारांकडे सोन्याची बिस्किटे असल्याची माहिती मिळाली. बहिणीचे लग्न असल्याने स्वतात सोने मिळाल्याने फायदा होईल, या हेतूने सुलतान हे सोने खरेदी करण्यास तयार झाले. व्यावसायिकाने त्याला अन्वरचा नंबर दिला. सुलतान यांनी अन्वरशी संपर्क साधला असता त्याने सोन्याच्या बिस्किटाचे सॅम्पल दाखविण्यासाठी त्यांना सानपाडा येथे बोलावले. २१ फेब्रुवारीला सुलतान यांनी सानपाड्यात अन्वरची भेट घेतली. सोन्याचे बिस्किट खरे वाटल्याने दोघांमध्ये बोलणी होऊन सुलतान यांनी ३० हजार रुपये प्रतितोळा दराने १० तोळे वजनाची सोन्याची बिस्किटे घेण्याची बोलणी केली. अन्वरने त्यांना बिस्किटे घेण्यासाठी २४ फेब्रुवारीला मानखुर्द टी जंक्शन येथे बोलावले. ठरल्याप्रमाणे सुलतान हे एका नातेवाइकाला सोबत घेऊन मानखुर्दला पोहचले.
अन्वरने त्यांच्याकडील पैसे घेऊन आपला भाऊ सोन्याची बिस्किटे घेऊन येत असल्याचे सांगून बोलण्यात गुंतवून पळ काढला. सुलतान आणि त्यांच्या नातेवाइकाने त्याचा पाठलाग केला. मात्र तो सापडला नाही. अखेर आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्याने सुलतान यांंनी मानखुर्द पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली.