नागपूर : विदेशी फेसबूक फ्रेंडने गिफ्ट पाठविण्याच्या नावाखाली एका महिलेला १२ लाख ४५ हजार रुपयांचा गंडा घातला. पीडित महिलेचा पती व्यावसायिक आहे. या व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीनुसार ४ जून २०२० ला त्यांच्या पत्नीला स्टीव्ह मायक्रोन नामक आरोपीची फ्रेंड रिक्वेस्ट आली. व्यावसायिकाच्या पत्नीने ती एक्सेप्ट केली. त्यानंतर आरोपी तिच्याशी चॅटींग करु लागला.
काही दिवसानंतर त्याने महिलेचा मोबाईल नंबर मागितला. तो मिळाल्यानंतर आरोपी आणि महिला संपर्कात राहू लागले. अलीकडे आरोपीने महिलेला तिच्यासाठी महागडे विदेशी गिफ्ट पाठविल्याची थाप मारली. महिलेने नको म्हणूनही त्याने तिला ते गिफ्ट पाठविल्याचे सांगितले. त्यानंतर साधना रॉय नमक महिलेचा पीडित महिलेला फोन आला. तुमच्यासाठी महागडे गिफ्ट आले असून त्याची कस्टम ड्युटी तुम्ही तातडीने भरा, असे कथित साधना हिने म्हटले.
कस्टम ड्युटी भरली नाही तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होईल, असा धाकही दाखवला. साधनाची साथीदार संचिता हिचाही नंतर फोन आला. या दोघींनी कारवाईचा धाक दाखवून पीडित महिलेला घाबरवल्यानंतर त्यांचा एक साथीदार बलविंदर खारीर याने आपले अकाऊंट नंबर देऊन वेगवेगळी कारणे सांगून पीडित महिलेला त्या खात्यात १२ लाख ४५ हजार रुपये भरण्यास भाग पडले. आरोपी वारंवार पैशाची मागणी करीत असल्यामुळे पीडित पत्नीने आपल्या पतीला ही बाब सांगितली. व्यावसायिकाने आप्तस्वकीयांशी चर्चा केल्यानंतर गणेशपेठ पोलीस ठाण्यात गुरुवारी तक्रार नोंदविली. सहाय्यक पोलीस निरीक्षक वडस्कर यांनी फसवणुकीच्या आरोपाखाली आरोपी मायक्रोन, साधना, संचिता आणि बलविदर या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
पूनम पांडे विनयभंग प्रकरण : सॅम बॉम्बे सध्या झिजवतोय पोलीस ठाण्याचे उंबरठे
Sushant Singh Rajput Case : आता तर अभिनेत्रींची नावं समोर आलीत; अभिनेते अजून बाकी आहेत! ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया
एनसीबी कार्यालयासमोर न्यूज चॅनल्सचे रिपोर्टर्स भिडले, पोलिसांचा वेळीच हस्तक्षेप
बॉलिवूडमधल्या ड्रग्ज कनेक्शनची पाळंमुळं खणून काढतोय डॅशिंग मराठी अधिकारी... चला भेटूया!
धारदार शस्त्राने हल्ला करून एका तरुणाची अज्ञाताने केली हत्या