मीरारोड - मुख्यमंत्री कोट्यातील फ्लॅट घेऊन देतो सांगून शाळेतल्या मित्रानेच टपाल खात्यातील निलंबित मित्राची १० लाखांना फसवणूक केली . या बाबत भाईंदरच्या नवघर पोलीस ठाण्यात १४ ऑगस्टच्या रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे .
मीरारोडच्या रामदेव मार्गवर वंदना अपार्टमेंट मध्ये राहणारे प्रकाश बिरवाडकर हे टपाल खात्यात पोस्टमन म्हणून काम करत होते . लग्न झाल्यावर त्यांना मीरारोड येथे मुख्यमंत्री कोट्यातील फ्लॅट स्वस्तात घेऊन देतो असे त्यांचा शाळेतील मित्र सुरेश शेलार रा . मंगलमूर्ती , सर्वोदय कॉम्प्लेक्स, गोल्डन नेस्ट समोर याने सांगितले होते .
मार्च २०१२ मध्ये शेलार यांनी मुख्यमंत्री कोट्यातून सदनिका मिळण्यासाठीचा अर्ज भरून घेतला व १५ हजार घेतले . त्या नंतर थोडे थोडे करून ७ लाख रोख आणि ३ लाख बँक खात्या द्वारे असे १० लाख घेतले. शेलार हा प्रकाश यांना मंत्रालयात साहेबांना भेटवण्यासाठी घेऊन जात मात्र भेट घालून दिली नाही . सारखे खाडे झाल्याने प्रकाश यांना २०१९ साली कामा वरून कमी केले गेले. शेलार याने डिंसेबर २०२२ मध्ये स्टॅम्प पेपर वर नोटरी करून लिहून दिले की, जानेवारी २०२३ मध्ये सर्व पैसे परत करतो. मात्र त्या नंतर देखील पैसे न दिल्याने प्रकाश यांनी फिर्याद दिली . वरिष्ठ निरीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करत आहेत .