लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यास गेलेल्या गृहिणीला मदत करण्याचे सांगत हात चलाखीने तिचे एटीएम चोरून बँक खात्यातून पैसे काढण्याचा प्रकार जोगेश्वरी पश्चिम येथे घडला. तिने ओशिवरा पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माधुरी यादव (३८) ही जोगेश्वरी पश्चिम परिसरातील एका नामांकित बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेली. मात्र, सर्व्हर डाऊन असल्याने ती आतमध्येच थांबली. काही वेळाने एक व्यक्ती तेथे आला. लवकर करा, उशीर होत आहे, असे बोलत त्याने मशीनची बटणे दाबायला सुरुवात केली आणि यादव हिचे कार्ड काढून दुसरेच कार्ड पुन्हा मशीनमध्ये टाकले.
पैसे काढण्यासाठी मदत करतो, असे ती व्यक्ती बोलू लागल्याने ती तेथून निघाली. ती दुसऱ्या एटीएम सेंटरमध्ये गेली. मात्र, तेथे पैसे निघाले नाही. तिने कार्ड तपासले असता तिचे कार्ड बदलण्यात आल्याचे लक्षात आले. ती पुन्हा आधीच्या एटीएम सेंटरमध्ये गेली. तेथे कोणीच नव्हते. काही वेळाने बँक खात्यातून तीन वेळा एटीएमद्वारे २५ हजार रुपये काढल्याचा मेसेज तिच्या पतीला आला. हातचलाखीने भामट्याने कार्ड चोरून पैसे काढल्याची तक्रार यादव हिने ओशिवरा पोलिसांत केली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.