ठाणे - फेसबुक पेजवर अल्प दरात मोबाईल तसेच लॅपटॉप विक्रीचे आमिष दाखवून ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या नीरजकुमार उर्फ देव जयकुमार दुबे (30, रा. काटेमानेवली, कल्याण, पूर्व) याला नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. त्याला 9 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.अंबरनाथ येथील रहिवाशी विजय चव्हाण हे ठाण्याच्या नौपाडयातील क्वेस्टा इन्स्टिटयूट, लोढे कंपाऊंड येथील क्लासेसमध्ये असतांना त्यांना फेसबुकवर पेजवर काग्रो प्रा. लि. या नावाने स्वस्त दरामध्ये मोबाइल आणि लॅपटॉप विक्रीचे अमिष दाखविण्यात आले. तसेच त्यांच्या मोबाईलचा व्हॉटसअॅप क्रमांक मिळवून त्यावरही एका भामटयाने नामांकित कंपनीच्या मोबाइलचे आणि लॅपटॉपचे फोटो पाठविले. त्यास चव्हाण यांनी संमती दाखविल्यानंतर त्यांच्याकडून 28 हजार रुपये आयएमपीद्वारे स्वीकारले. अर्थात, त्यांना त्या मोबदल्यात कोणताही मोबाइल किंवा लॅपटॉपही देण्यात आला नाही. मे ते सप्टेंबर 2019 या पाच महिन्यांच्या कालावधीमध्ये हा प्रकार घडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर चव्हाण यांनी याप्रकरणी 30 सप्टेंबर रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात फसवणूकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले, पोलीस निरीक्षक रविंद्र क्षीरसागर, अविनाश सोंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे आणि उपनिरीक्षक विनोद लबडे यांच्या पथकाने नीरजकुमार याला कल्याणच्या कोळसेवाडी भागातून 6 ऑक्टोबर रोजी अटक केली. त्याच्याकडून अशाच प्रकारच्या फसवणूकीचे आणखीही गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
फेसबुकद्वारे कमी किमतीत लॅपटॉप विक्रीचे आमिष दाखवून फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2019 10:00 PM
9 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
ठळक मुद्देनीरजकुमार याला कल्याणच्या कोळसेवाडी भागातून 6 ऑक्टोबर रोजी अटक केली. त्याच्याकडून अशाच प्रकारच्या फसवणूकीचे आणखीही गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.