महाड - भूसंपादनाच्या बदल्यात शासनाने न्यायालयाकडे जमा केलेला कोट्यवधींचा मोबदला घेण्यासाठी मृत व्यक्ती जिवंत असल्याचे बनावट कागदपत्रे बनवून न्यायालय व शासनाची फसवणूक करण्याचा प्रकार उघड झाला आहे. आंबिवली येथील धरणासाठी करंजाडी येथील भूसंपादनातून हा प्रकार घडला असून, महाड न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार चार वकिलांसह एकूण दहा जणांविरुद्ध महाड पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
जयवंती मिरगळ, नथुराम मिरगळ, सुनील मिरगळ, अनिल मिरगळ, ज्ञानेश्वर मिरगळ, किशोर मिरगळ (सर्व रा. करंजाडी), ॲड. भारत नवाळे, ॲड. रचना थाले, ॲड. प्रिया परांगे व ॲड. हेमंत भगत (चौघे रा. पनवेल) अशी याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. मधुकर मिरगळ यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार महाड न्यायालयाने दि. ३१ ऑगस्टला याप्रकरणी संबंधित चार वकिलांसह दहा जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला आहे. फसवणुकीचा प्रकार दि.११ फेब्रुवारी २०१९ ते ३१ ऑगस्ट २०२२ या कालावधीत घडला आहे. महाड तालुक्यातील आंबिवली येथे होणाऱ्या धरणाच्या कामाकरिता मिरगळ कुटुंबीयांची वडिलोपार्जित जमीन २००५ मध्ये संपादित केली होती.
मोबदल्याचे झाले नव्हते वाटप या जमिनीचा सुमारे ५४ हजार रुपये मोबदला शासनाकडून करण्यात आला होता. परंतु, त्याचे वाटप झाले नव्हते. मोबदला वाढविण्यासाठी वारसदारांनी महाड येथील दिवाणी न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार न्यायालयाने २०१७ मध्ये संबंधितांना एक कोटी ३५ लाख रुपये मोबदला देण्याचे आदेश दिले. त्यानुसार शासनाकडून २०१९ मध्ये रक्कम न्यायालयात जमा केली. ती मिळविण्यासाठी बनावट कादगपत्रे तयार करून न्यायालयात सादर केले.
न्यायालयाचीही केली फसवणूक दगडू मिरगळ हे मृत झालेले असतानाही त्यांच्या जागी दुसरी व्यक्ती उभी करून खोटे कागदपत्रे करून त्याआधारे खोटे प्रतिज्ञापत्रही सादर केले. ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास येताच न्यायालयाने संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. याप्रकरणी पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे अधिक तपास करत आहेत. दरम्यान, यातील आरोपींना लवकरच अटक केली जाईल अशी माहिती यावेळी पोलिसांकडून देण्यात आली. दोषींवर नक्कीच कारवाई करू.