जळगाव - एटीएम कार्डची अदलाबदल करुन एका ठगाने अनिता प्रमोद चौधरी (५०, रा. जळगाव) यांना १ लाख २८ हजार रुपयात फसविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अनिता चौधरी या शनिवार १६ मार्च रोजी सकाळी जळगावातील गुजराल पेट्रोलपंपाशेजारील अॅक्सीस बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या. त्यांच्या मागे थांबलेल्या पंचवीस वर्षीय तरूणाने ‘मावशी तुमचे पैसे काढून देतो’, असे सांगून त्यांच्या हातातील एटीएम कार्ड घेत एटीएमच्या मशीनमध्ये टाकले. परंतु मशीनमध्ये पैसे नाहीत,असे कारण सांगून हातचलाखीने चौधरी यांचे कार्ड स्वत:कडे ठेवून सूर्यभान राजभर नावाच्या व्यक्तीचे कार्ड त्यांना देऊन पसार झाला. महिलेचे एटीएम कार्ड लागल्याने संशयिताने जळगाव व नागपूर येथून पैसे काढले आणि सोने खरेदी केले. फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यानंतर अनिता चौधरी यांनी मंगळवारी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्यावरून अनोळखी तरूणाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
एटीएम कार्डची अदलाबदल करून महिलेची सव्वा लाखात फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 12:13 AM