मुंबई : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांचा स्वीय सहायक असल्याची बतावणी करत कुलाब्यातील बडे मियाँ हॉटेलच्या मालकाची ११ लाख २७ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या सुरज कलव (३०) याच्या कोठडीत १२ ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे. कलव याने ठगीच्या पैशांतून मित्र, मैत्रिणींशी जीपेद्वारे आर्थिक व्यवहार केल्याचेही समोर आले आहे.बडे मिया हॉटेलचे मालक जमाल मोहम्मद यासीन शेख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अधिवेशन सुरू असताना २ जुलैच्या रात्री त्यांना सुरजने कॉल केला. त्याने सावंत यांचा पीए असल्याची बतावणी करत जेवण मागविले. सुरुवातीला वेळेत पैसेही दिले. कालांतराने जेवणाचे दोन लाख थकविले आणि पैसे अधिवेशनानंतर देतो असे सांगितले. त्यानंतर शेख याच्या मुलीला सुरजने शासकीय विधि कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून नऊ लाख २७ हजार रुपये उकळले.
आर्थिक व्यवहारांची कसून चौकशीसुरजचे स्वतःचे बँक खाते नाही. त्याने केलेले सर्व आर्थिक व्यवहार मित्र, मैत्रीण तसेच नातेवाइकांच्या खात्यांवर केल्याचे पोलिस तपासात समोर आले. फसवणुकीच्या पैशांतून त्याने मैत्रिणीला जीपेद्वारे ट्रान्सफर केलेले, तसेच मित्राला वाढदिवसानिमित्त दिलेले १ लाख १९ हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे. दुसरीकडे बारमध्ये ज्या बारगर्लवर त्याने पैसे उडवले तिची चौकशीही करण्यात येते आहे. कॉलेज प्रवेशासाठी रोख स्वरूपात घेतलेली रक्कम अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नसून याप्रकरणात आणखी कुणाचा सहभाग आहे का, हेदेखील पोलिस तपास करत आहे.