नागपूर : शहरात आणि शहराबाहेर मोठ्या प्रमाणावर खुले (अवैध) बार सुरू आहेत. विविध मार्गांवर कुठे एकांतस्थळी तर कुठे वर्दळीच्या ठिकाणी असलेले हे अवैध बार सावजी रेस्टॉरंट अन् ढाब्याच्या आडोशाने चालविले जात आहेत. या ढाब्यांवर झणझणीत, चटकदार सावजी रस्सा - भाजी खा अन् हवे ते कोल्ड्रिंक घेऊन बिनधास्त पाहिजे तेवढा वेळ दारू प्या, अशी ढाबेवाल्यांची खुली ऑफर आहे. एक्साईज अथवा पोलिसवाल्यांकडून कोणतीही कारवाई होणार नाही, असा मद्यपींना विश्वास दिला जात असल्याने गार्डन, रेस्टॉरंट, ढाब्याच्या आडून चालणाऱ्या या अवैध खुल्या बारमध्ये ग्राहकांच्या मोठ्या प्रमाणात उड्या पडताना दिसत आहेत.
नागपूर सावजीची ‘भाजी-रस्सा’ देशभरातील खवय्यांच्या आवडीचा विषय आहे. नागपूर - विदर्भात तर त्याचे लाखो दिवाने असून, सर्वच वयोगटातील मंडळींना सावजीचे नुसते नावही तोंडाला पाणी सोडण्यासाठी पुरेसे आहे. तरुणाईतही सावजीची मोठी क्रेझ आहे. त्यामुळे शहराच्या ‘आउटर’लाच नव्हे तर शहराच्या मधोमध झगमगीत लायटिंग असलेले रेस्टॉरंट कम ढाबे फुललेले दिसतात. रात्रीच्या वेळी यापैकी अनेक ढाब्यांवर बसण्यासाठी चक्क वेटिंग असते.बारमध्ये बसण्याच्या अनेक अडचणी असतात. गोंगाट असतो, कोंदट वातावरण अन् ऐसपैस जागाही नसते.
बारमध्ये येणारे काही बाही बोलतात. शिवाय तेथे कोणत्याही वेळेला भांडण होऊ शकते. त्यामुळे कथित प्रतिष्ठीत मंडळी अन् खासकरून चांगली मंडळी बारमध्ये जाण्याचे टाळतात. याउलट गार्डन रेस्टॉरंट, ढाबामध्ये खुले स्वच्छ वातावरण, एकांत, चांगली सर्व्हीस मिळते. अनेक ठिकाणी रूमही असतात. या बहुतांश रेस्टॉरंट - ढाबेवाल्यांकडे मद्य परवाना (दारू विकण्याचा, तेथे पिऊ देण्याचा) नाही. मात्र, तेथे बिनधास्त दारू प्यायली अन् पाजली जाते. सोबत घेऊन जाणाऱ्यांना तेथे पाहिजे तो चाखणा उपलब्ध करून दिला जातो अन् अनेक ढाब्यांवर पाहिजे ते मद्य, बीअरही आणून दिली जाते.
सगळेच खुल्लम खुल्लापरवाना नसताना दारूचा ‘बार’ उडविण्याचा प्रकार शहरातील अनेक रेस्टॉरंट, ढाब्यावर खुल्लम खुल्ला दिसून येतो. आजूबाजूच्या पोलिसांकडून अन् उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई होणार नाही, अशी हमी ढाबा मालकांकडून मिळत असल्याने ढाब्याच्या आडून चालणाऱ्या या अवैध खुल्या बारमध्ये ग्राहकांची गर्दी दिसून येते.
सरकारला फटका, अधिकारी मस्तविशेष म्हणजे, या संपूर्ण गैरप्रकारातून सरकारला कराच्या रुपाने मोठा फटका दिला जातो. मात्र, स्वत:चे खिसे भरण्यासाठी संबंधित अधिकारी, त्याकडे लक्ष देत नाहीत. अनेक अधिकारी स्वत:च अनेक या अवैध बार रेस्टॉरंटमध्ये नियमित 'टेस्ट व्हिजिट' करण्यासाठी येत असल्याचे बोलले जाते.