औरंगाबाद: बँकातून मोठ्या रक्कमा काढणाऱ्यांवर पाळत ठेवून वाहनाची काचा फोडून, डिक्की उचकटून लाखो रुपयांच्या बॅगा पळविणाऱ्या आंतरराजीय चेन्नई टोळीला पैठण येथे अटक करण्यात गुन्हेशाखेला ८ डिसेंबर रोजी यश आले. या टोळीकडून रोख ५२ हजार ७२० रुपये,चोरीच्या पाच दुचाकी, २५ मोबाईल, बनावट ओळखपत्र, आधारकार्ड, काचा फोडण्यासाठी स्क्रू ड्रायवर, टोकदार गलोल, छर्रे, डिक्की उघडण्यासाठी टोकदार वस्तू जप्त करण्यात आले.
अटकेतील टोळीने औरंगाबादसह देशभरातील विविध शहरातून पैशाच्या बॅगा पळविण्याचे ५० हून अधिक गुन्हे केल्याचे समोर आले. प्रकाश नारायणा मेकला (३१), राजू नारायणा कोलम (२७), राजू यादगिरी बोनाला (३५सर्व रा.चेन्नई, तामिळनाडू), सुरेश अंजया बोनालू (२७,मारूतीनगर, विजयवाडा, आंध्रप्रदेश ), जोसेफ नारायणा मेकला(३३), आणि अशोक नारायणा कोंतम (२३, दोघे रा. पेरियारनगर , चेन्नई)अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी याविषयी पत्रकार परिषदेत सांगितले की, गतवर्षी औरंगाबाद शहरातील विविध भागातून पैशाच्या बॅगा पळविण्याच्या घटना घडल्या होत्या. तेव्हा संशयित आरोपी विविध सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. शिवाय संशयितांचे मोबाईल नंबरही पोलिसांनी शोधून काढले होते. मात्र एकदा कॉल केल्यानंतर ते मोबाईल बंद करीत आणि दुसऱ्या क्रमांकावरून बोलत. हे गुन्हेगार बाहेरील राज्यातील असल्याचे समोर आल्याने ते पोलिसांना सापडत नव्हते. मात्र गुन्हेशाखेचे अधिकारी त्यांचा शोध घेत होते.
दरम्यान काही दिवसापूर्वी बीड जिल्ह्यातील गेवराई येथे ९ लाखाची बॅग पळविल्याची माहिती गुन्हेशाखेला मिळाली. तेव्हापासून ही टोळी पुन्हा सक्रिय झाल्याचे गृहित धरून गुन्हेशाखेने पुन्हा त्यांचा शोध सुरू केला तेव्हा त्यांच ते पैठण येथे असल्याचे समजले. गुन्हेशाखेचे निरीक्षक मधूकर सावंत, सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल यांचे पथकाने दिवसभर शोध घेतल्यानंतर रात्री उशीरा ते पैठणमधील नाराळा वसाहतीत खोली भाड्याने करून राहात असल्याचे समजले. यांनतर त्यांना तेथे मोठ्या शिताफीने पकडण्यात आले. या टोळीकडून रोख ५२ हजार ७२० रुपये,चोरीच्या पाच दुचाकी, २५ मोबाईल, बनावट ओळखपत्र, आधारकार्ड, काचा फोडण्यासाठी स्क्रू ड्रायवर, टोकदार लोखंडी टी , गलोल, छर्रे, डिक्की उघडण्यासाठी टोकदार वस्तू जप्त करण्यात आले.
ही कारवाई पोलीस आयुक्त, उपायुक्त मिना मकवाना, सहायक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, पो.नि. सावंत, सपोनि जारवाल, उपनिरीक्षक विजय जाधव, कर्मचारी शिावाजी झिने, राजेंद्र साळुंके, प्रकाश चव्हाण, प्रभाकर राऊत, नितीन देशमुख, संदीप क्षीरसागर, दादासाहेब झारगड, दत्तात्रय वाघमारे, दत्तात्रय होरकाटे यांच्या पथकाने केली.