चेन्नई: रिक्षाचालकाची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. ए. माधन कुमार, ए. धनुष, के. जयप्रकाश आणि एस. भरत अशी अटक झालेल्या आरोपींची नावं आहेत. आरोपींनी दिलेली हत्येची माहिती ऐकून पोलिसदेखील चक्रावले. आरोपींनी रिक्षाचालक रविचंद्रनला बेदम मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी त्याच्या मृतदेहासोबत सेल्फी काढला.
रविचंद्रनची हत्या केल्याचं मित्रांना समजावं यासाठी आरोपींनी मृतदेहासोबतचा सेल्फी व्हॉट्स ऍपवर शेअर केला. या फोटोच्या आधारे पोलिसांनी हत्या करणाऱ्या चारही आरोपींना अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविचंद्रनचं काही दिवसांपूर्वी ओल्ड नप्पलायममध्ये वास्तव्यास असलेल्या माधन आणि त्याच्या मित्रांशी भांडण झालं. मात्र हे भांडण जीवावर बेतेल, याची कल्पना त्यानं केली नव्हती.
गेल्या बुधवारी माधननं रविचंद्रनला मनाली न्यू टाऊनमधील एका मैदानात दारू पिण्यासाठी बोलावलं. आपल्यातला वाद संवाद साधून संपवू, असं माधननं सांगितलं. त्यानंतर रविचंद्रन दारू पार्टीत सहभागी होण्यासाठी गेला. मात्र बराच वेळ तो घरी न परतलल्यानं पत्नी किर्तनाला चिंता सतावू लागली. तिनं रविचंद्रनला फोन केला. पण त्याचा फोन स्विच ऑफ होता. त्यानंतर किर्तना तिच्या नातेवाईकांना घेऊन रविचंद्रनला शोधण्यासाठी निघाली.
रविचंद्रनला शोधता शोधता किर्तना आणि नातेवाईक एमआरएफ मैदानात पोहोचले. तिथे एका कोपऱ्यात रविचंद्रन बेशुद्धावस्थेत पडला होता. माधन आणि त्याचे अन्य साथीदारांनी किर्तना आणि त्याच्या नातेवाईकांना धमकावलं. त्यानंतर ते तिथून निघून गेले. रविचंद्रनच्या संपूर्ण शरीरावर जखमांच्या खुणा होत्या. माधन आणि त्याच्या साथीदारांनी रविचंद्रनवर दारूच्या बाटल्यांनी हल्ला केला होता. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला.