नवी दिल्ली - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना बिहारमध्ये घडली आहे. बिहारच्या छपरा जिल्ह्यामध्ये एक भयंकर घटना समोर आली आहे. धावत्या एक्स्प्रेसमध्ये दरोडा पडला असून एका प्रवाशावर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बरौनी-ग्वाल्हेर एक्स्प्रेसमध्ये दरोड्याची घटना घडली. या घटनेला विरोध केला असता दरोडेखोरांनी एका प्रवाशावर गोळ्या झाडल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील सोनपूरजवळ धावत्या एक्स्प्रेसमध्ये दरोड्याची घटना घडली आहे. या दरम्यान दरोडेखोरांनी एका प्रवाशाला गोळ्या घातल्या. शिवम कुमार असं जखमी प्रवाशाचं नाव असून तो उत्तर प्रदेशातील इटावा येथील रहिवासी आहे. शिवम कुमार काही कामानिमित्त मुझफ्फरपूर येथे गेला होता. तेथून परतत असताना हा धक्कादायक प्रकार घडल्याचं त्याने म्हटलं आहे. सोनपूरजवळ अचानक काही दरोडेखोर एक्स्प्रेसमध्ये चढले. त्यांनी प्रवाशांना लुटण्यास सुरुवात केली.
काही प्रवाशांनी दरोडेखोरांना विरोध केला, शिवम कुमार या प्रवाशाने देखील त्यांना विरोध करण्यास सुरुवात केली. तेव्हा संतापलेल्या दरोडेखोऱ्यांनी त्याला गोळ्या घातल्या. त्यानंतर जवळपास 15 ते 20 प्रवाशांचे मोबाईल आणि रोकड लुटली. एक्स्प्रेस छपरा येथे पोहोचल्यानंतर जखमी प्रवाशाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती ठिक असल्याची माहिती मिळत आहे. लूटमार केल्यानंतर दरोडेखोरांनी चेन पुलिंग करून एक्स्प्रेस थांबवली आणि ते फरार झाले आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
भयंकर! उन्नाव पुन्हा एकदा हादरले, शेतात आढळले 2 मुलींचे मृतदेह तर तिसरीची मृत्युशी झुंज
जंगलामध्ये संशयास्पद अवस्थेत तीन मुली आढळून आल्या. घटनेची माहिती मिळताच मुलींना लगेचच जवळच्या सार्वजनिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आलं. मात्र दोन मुलींना मृत घोषित करण्यात आलं. तर तिसऱ्या मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला कानपूरच्या एका रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. तिन्ही मुली या आपल्या शेतात चारा आणण्यासाठी गेल्या होत्या. त्याच दरम्यान हा धक्कादायक प्रकार घडल्याचं म्हटलं जात आहे. घटनेची माहिती मिळताच डीएम आणि अन्य अधिकारी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहे. गाव आणि रुग्णालय परिसराच्या आसपास पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
"अत्यंत भयावह! योगीचं राज्य मुलींसाठी स्मशानभूमी बनलं, हे अत्याचार कधी थांबणार?"
आपचे नेते संजय सिंह यांनी देखील योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला असून टीकास्त्र सोडलं आहे. "अत्यंत भयावह... आदित्यनाथजींचं राज्य मुलींसाठी स्मशानभूमी बनलं" असं म्हणत जोरदार टीका केली आहे. संजय सिंह यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "अत्यंत भयावह... आदित्यनाथजींचं राज्य मुलींसाठी स्मशानभूमी बनलं आहे, उन्नावची घटना मन हेलावून सोडणारी आहे. हे अत्याचार कधी थांबणार?" असं संजय सिंह यांनी म्हटलं आहे. आझाद समाज पक्षाचे नेते चंद्रशेखर आझाद यांनीही या घटनेवर भाष्य केलं आहे. "उत्तर प्रदेशच्या उन्नावमधील घटना अत्यंत भयावह आहे. दोन दलित मुलींचे मृतदेह सापडले आहेत. एक जखमी आहे. मुलीला एअर अॅम्ब्युलन्सद्वारे तातडीने एम्स दिल्ली येथे आणायला हवे. आम्ही आता कोणत्याही स्थितीत हाथरसची पुनरावृत्ती होऊ देणार नाही. आमची टीम घटनास्थळी जात आहे. बहिणींच्या सुरक्षिततेशी आणि सन्मानाशी कोणतीही तडजोड करणार नाही" असं चंद्रशेखर यांनी म्हटलं आहे.