मुंबई - राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि मुंबईतील त्याच्या साथीदारांसह काही हवाला ऑपरेटर्सवर मोठी कारवाई केली आहे. तपास यंत्रणेने त्यांच्याशी संबंधित डझनाहून अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत. या छाप्यादरम्यान एनआयएने सलीम फ्रुट्ला ताब्यात घेतले आहे. याशिवाय कय्युम नावाच्या आणखी एका व्यक्तीलाही एनआयएने माहीममधून ताब्यात घेतले आहे. कय्युम आणि सलीम हे दाऊद इब्राहिमचे जवळचे साथीदार असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्याकडून अनेक महत्त्वाची कागदपत्रेही तपास यंत्रणेने ताब्यात घेतली आहेत.NIA नुसार ज्या ठिकाणी छापे टाकण्यात आले, त्यात नागपाडा, गोरेगाव, बोरिवली, सांताक्रूझ, मुंब्रा, भेंडी बाजार आणि इतर अनेक ठिकाणांचा समावेश आहे. याशिवाय एनआयएने वांद्रे, कुर्ला आणि माहीममध्येही छापे टाकले आहेत. अनेक हवाला ऑपरेटर आणि ड्रग पेडलर दाऊदशी संबंधित होते आणि NIAने फेब्रुवारीमध्ये या संदर्भात गुन्हाही नोंदवला होता. दाऊद इब्राहिमचा भारताच्या मोस्ट वाँटेड यादीत समावेश आहे आणि तो पाकिस्तानमध्ये बसून आपला अवैध धंदा चालवत आहे. त्याला पाकिस्तान सरकार आणि लष्कराचा पूर्ण पाठिंबा असल्याच्या बातम्या यापूर्वी अनेकदा आल्या आहेत. मात्र, दाऊद इब्राहिम किंवा त्याचे साथीदार पाकिस्तानात राहत असल्याचा पाकिस्तान सरकार सातत्याने नकार देत आहेत. यासंदर्भात भारताने अनेकवेळा पुरावे पाकिस्तान सरकारला दिले आहेत. या संदर्भात भारताने पाकिस्तानला सादर केलेल्या डॉजियरमध्ये दाऊदचा पूर्ण पत्ताही नमूद करण्यात आला आहे. दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मियांदादचा चुलत भाऊही आहे.
यापूर्वीही विविध तपास यंत्रणांनी दाऊद इब्राहिमच्या साथीदारांवर देशभरात विशेषतः मुंबई आणि महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये छापे टाकले आहेत. यावेळीही तपास यंत्रणांना मिळालेल्या ठोस माहितीच्या आधारे छापे टाकण्यात आले आहेत.