लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बोगस दस्तावेज बनवून दक्षिण मुंबईतील २५ कोटी रुपये किमतीची मालमत्ता हडप केल्याप्रकरणी दाऊद इब्राहिम याचा खास हस्तक गॅगस्टर छोटा शकीलचा साडू मोहम्मद सलीम इक्बाल कुरेशी उर्फ सलीम फ्रुट याच्यासह मुस्लीम असगरअली उमरेटवाला, शेरझादा जंगरेज खान, अस्लम अब्दुल गनी पटनी आणि रिझवान अल्लाउद्दीन शेख यांना सोमवारी गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने बेड्या ठोकल्या. त्यांच्या आणखी सहा साथीदारांचा शोध पोलिस घेत आहेत.
पाचही आरोपींना ३० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, सध्या दक्षिण आफ्रिकेत वास्तव्यास असलेले ६४ वर्षीय तक्रारदार अहमद युसूफ लम्बात हे सनदी लेखापाल असून, २००६ साली त्यांचे वडील युसूफ हासम लम्बात यांचे निधन झाले होते. त्यांच्या मालकीची बाबूला टँक रोड, उमरखाडी परिसरात लम्बात नावाची एक इमारत आहे. या इमारतीसह त्यांच्या मालमत्तेची देखभाल करण्याची जबाबदारी शबीर अहमद हसन करोलिया आणि युसूफ हसन करोलिया यांच्याकडे होती. भाड्याची रक्कम त्यांच्या बहिणीकडे जमा होत होती.अहमद युसूफ लम्बात यांच्या वडिलांच्या निधनानंतर करोलिया यांनी भाडे देण्याचे बंद केले. याबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनी मालमत्ता विकल्याचे सांगताच त्यांना धक्का बसला. चौकशीत या मंडळींनी बोगस दस्तावेज तयार करून परस्पर विक्री केल्याची कागदपत्रे हाती लागली. मालमत्ता बाजारभावापेक्षा कमी किमतीत सलीम फ्रुट याची पत्नी शाझिया कुरेशी हिच्यासह यासिन अहमद आणि शेरझादा यांना विकण्यात आली होती.
आरोपींचा शोध सुरूया गुन्ह्यांत इब्राहिम लम्बात, शाझिया कुरेशी, युसूफ करोलिया, शबीर करोलिया, सुभाष साळवे, यास्मिन अहमद यांचा सहभाग समोर आला असून त्यांचा शोध सुरू आहे.