नवी दिल्ली - ‘आयएनएक्स मीडिया’ कंपनीत सात वर्षांपूर्वी ३०५ कोटी रुपयांच्या परकीय गुंतवणुकीस परवानगी देताना झालेल्या कथित भ्रष्ट व्यवहारांच्या आरोपांवरून अटक झालेले माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदंबरम यांना २६ ऑगस्टपर्यंत सीबीआयच्या कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने गुरुवारी दिले. त्यानुसार आज सीबीआय कोठडी संपल्याने चिदंबरम यांना न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने पुन्हा ४ दिवसांची म्हणजेच ३० ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. आज दुपारच्या सुमारास आयएनएक्स मीडिया प्रकरणी माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाने दणका देत पी. चिदंबरम यांना सीबीआयने केलेल्या अटकेच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास कोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
आज पार पडलेल्या सुनावणीदरम्यान अटक झाल्यानंतर सुनावणी करण्याचा काहीच अर्थ राहत नाही, असे यावेळी सुप्रीम कोर्टाने सांगितले. तर, दुसकीकडे गैरव्यवहार प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. याप्रकरणी ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये पी. चिदंबरम यांनी विदेशात बनावट कंपन्या स्थापन केल्या आणि त्यांनी या माध्यमातून पैशांचा फेरफार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आज सुप्रीम कोर्टाने दणका देत अटकेविरोधातील याचिका फेटाळून लावली तर सायंकाळी सीबीआय कोठडी संपल्याने कोर्टात हजर केल्यानंतर कोर्टाने पुन्हा चार दिवसांनी सीबीआय कोठडीत वाढ केली असल्याने आज दिवसभरात दोनदा चिदंबरम यांना कोर्टाने दणका दिला आहे.