ट्विटर इंडियानं सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीच्या तक्रारीवरुन कारवाई करत भारताचे 48 वे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या नावाने सुरू असलेले फेक ट्विटर अकाउंट बंद केले आहे. दोनच दिवसांपूर्वी देशाच्या सरन्यायाधीशपदी रमणा हे रुजू झाले होते. त्यांचे कोणत्याही सोशल मीडियावर अकाउंट नाही. तरीही त्यांच्या नावाने एक फेक अकाउंट ट्विटरवर कार्यरत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीला आढळलं होतं. त्यामुळं ट्विटरकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.
@NVRamanma नावानं आणि प्रोफाइलमध्ये सीजेआय अर्थात चीफ जस्टिस ऑफ इंडिया अशी माहिती असलेले एक फेक ट्विटर हँडल असल्याचे रजिस्ट्रीच्या निदर्शनास आलं होतं. रजिस्ट्रीने तत्काळ याविरुद्ध ट्विटरकडे तक्रार केली. ट्विटर इंडियानेही तातडीने या तक्रारीची दखल घेत कारवाई केली आणि हे बनावट अकाउंट अखेरबंद केलं, अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिली.
सरन्यायाधीश एन. व्ही. रामणा कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नसतानाही त्यांच्या नावे असे बनावट अकाउंट सुरु असणं ही अत्यंत गंभीर बाब असल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीने दिल्ली पोलिसांना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यास सांगितले आहे.