मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांना अज्ञात व्यक्तीने धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. आमच्या मागण्यांची पूर्तता न केल्यास सक्तवसुली संचालनालय (ईडी), केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभाग (सीबीआय) व राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) यांची चौकशी लावू, असा धमकीचा संदेश त्यांच्या व्हॉट्सॲपवर आला आहे. याबाबत नार्वेकर यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांच्याकडे तक्रार केली आहे. नार्वेकर यांच्याकडे आरोपींनी नेमकी कोणती मागणी केली, याचे तपशील उघड झालेले नाहीत. आता पोलिसांच्या तपासातून हा मेसेज कोणी व का केला, खरोखर धमकी होती की खोडसाळपणे कृत्य केले, हे स्पष्ट होईल. मुंबई पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून, गुन्हे अन्वेषण शाखेच्या खंडणीविरोधी पथकाकडून तपास करण्यात येत आहे. त्यासाठी तीन पथके नेमली असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी सायबर तज्ज्ञांची मदत घेण्यात येणार आहे.
मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांना ईडी चौकशीची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 6:55 AM