कल्याण : पाणी भरण्याच्या वादावरून वयोवृद्ध पत्नीला अमानुष मारहाण करणारा आणि आळंदीला पसार झालेला हभप गजानन बुवा चिकणकरला हिललाइन पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात गंभीर मारहाण, शिवीगाळ, दमदाटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. संतापी वृत्तीच्या या बुवामुळे घरातील मंडळींवर त्याची दहशत आहे. त्यामुळे कोणीही तक्रार दाखल करायला पुढे येत नव्हता. अखेर पोलिसांनी स्वत:हून तक्रार दाखल करून त्याच्यावर फौजदारी कारवाई केली.
कल्याण तालुक्यातील मलंगपट्ट्यातील द्वारली गावातील चिकणकरच्या बुवाचा वयोवृद्ध पत्नीला बेदम मारहाण करीत असल्याचा व्हिडीओ त्यांच्या नऊ वर्षांच्या नातवाने शूट करीत व्हायरल केला. यात स्वत:ला बुवा म्हणविणाऱ्या चिकणकर महाराजांचे रूप पाहून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले. या व्हिडीओची माहिती मिळताच पोलीस त्याच्या घरी चौकशीकरिता गेले असता तो आळंदीला गेल्याची माहिती त्यांना मिळाली. बुवाच्या दहशतीमुळे त्याच्या घरातील कोणीही सदस्य तक्रार दाखल करण्यासाठी पुढे येईना.
त्याच्या तापट स्वभावामुळे तो वयोवृद्ध पत्नीला मारहाण करीत असताना घरातील कोणीही व्यक्ती तिला वाचवायला तसेच त्याला रोखायला पुढे आले नसल्याचेही व्हिडीओतून दिसून आले. दरम्यान, कल्याणमधील शिवसेनेच्या पदाधिकारी राधिका गुप्ते, आशा रसाळ, राणी कपोते यांसह अन्य महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रविवारी संध्याकाळी चिकणकर याचे घर गाठत मारहाण झालेल्या वयोवृद्ध महिलेची चौकशी केली. मारहाणीच्या वेळी बघ्याची भूमिका घेणाऱ्या घरातील सदस्यांनाही शिवसेना स्टाइलने दम भरला.
बुवाच्या दहशतीमुळे त्याच्या घरातील कोणीही सदस्य तक्रार दाखल करण्यासाठी पुढे येईना. आळंदीला पसार झालेल्या बुवाला कल्याणमध्ये दाखल होताच सेनेचा हिसका दाखवून देऊ, असा इशाराही यावेळी दिला. बुवाची घरात प्रचंड दहशत असतानाही आजीला होणाऱ्या रोजच्या मारहाणीला कंटाळलेल्या नऊ वर्षांच्या नातवाने व्हिडीओ शूट करून व्हायरल केल्याबद्दल सेना महिला पदाधिकाऱ्यांनी त्याचे कौतुक केले.
अखेर पोलिसांनी घेतला पुढाकार पत्नीला अमानुष मारहाण करणाऱ्या गजानन चिकणकरच्या विरोधात तक्रार देण्यास कुटुंबातील व्यक्तींनी नकार दिला. अखेर हिललाइन पोलिसांनी स्वत:हून पुढाकार घेत चिकणकरविरोधात तक्रार दाखल करीत त्याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन खांदारे यांनी दिली.