मुंबई : मराठी मालिकेत काम करणारी बालकलाकार साईशा भोईर हिची आई पूजा हिने गुंतवणुकीवर उत्तम परतावा देण्याचे आमिष दाखवत, शैक्षणिक संस्थेचे संचालक आणि त्यांची पत्नी या दोघांनाही तब्बल १६ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कफ परेड पोलिसांनी पूजा भोईरवर फसवणूक, तसेच अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
कुलाबा येथे राहणारे मयुरेश पत्की हे जनजागृती शिक्षण मंडळ या संस्थेचे संचालक आहेत. त्यांची पत्नी नेहा पत्की यांची गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये इन्स्टाग्रामवर पूजा भोईरशी ओळख झाली. साईशाचा अभिनय आवडत असल्याने नेहा तिच्या फॅन होत्या. त्यातूनच पूजा आणि नेहा यांच्यात मैत्री झाली. मैत्रीदरम्यान नेहा यांनी पूजाचा मोबाइल नंबरही मिळवला. पूजाचा ऑप्शन स्ट्रॅटेजी मॉडेल नावाने गुंतवणुकीचा व्यवसाय असून, दर आठवड्याला १०.१० टक्के नफा मिळवून देत असल्याचे तिने नेहा यांना सांगितले. पूजाने नेहा आणि मयुरेश या दोघांनाही गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. त्यानुसार, दोघांनीही पूजाच्या कंपनीत १६ लाख रुपयांची गुंतवणूक केली. ५ डिसेंबर, २०२२ रोजी एकूण नफ्यातील ३० टक्के कमिशन कापत उरलेले पैसे पूजाने पत्की दाम्पत्याच्या बचत खात्यावर जमा केले.
दुसऱ्या महिन्यातही तिने परतावा दिला. मात्र, नंतर परताव्याबाबत पूजा टाळाटाळ करू लागली. त्यामुळे १० फेब्रुवारी रोजी पत्की दाम्पत्याने पूजाकडे रकमेची मागणी केली. पूजाने १७ फेब्रुवारीला दोन चेक दिले आणि २८ फेब्रुवारीपर्यंत रक्कम जमा न झाल्यास चेक बँकेत भरण्यास सांगितले, परंतु दोन्ही चेक बाउन्स झाले. चेक बाउन्स झाल्याने नेहाने ११ मार्चला १ लाख रुपये परत केले. मात्र, उर्वरित पैशांसाठी पूजाला पत्कींनी नोटीस पाठविली. त्यास पूजाने उत्तर दिले नाही. अखेरीस पत्की दाम्पत्याने फसवणुकीप्रकरणी पूजाविरोधात पोलिसांत धाव घेतली.