भोपाळ: आजच्या धावपळीच्या जगात लोकांकडे सर्वकाही आहे फक्त वेळ नाही. नात्यांना वेळ दिल्यानेच नाती बळकट होतात आणि त्यामुळेच आपुलकी वाढत असते. त्यामुळे एक चांगलं नातं टिकण्यासाठी त्या नात्याला पुरेसा वेळ देणं खूप गरजेचं आहे. आजकाल लोकांकडे पैशांची श्रीमंती पाहायला मिळते पण अनेकजण वेळेच्या श्रीमंतीपासून खूप दुरावले आहेत. काहींना आपल्या जवळच्या नातेवाईकांना वेळ देता येत नाही. त्यामुळे नात्यात दुरावा निर्माण होतो. याचाच प्रत्यय देणारी एक धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये घडली आहे. कारण इथे आई-वडील आपल्याला वेळ देऊ शकत नाहीत म्हणून बारावीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे.
मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये राहणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या करून आपले जीवन संपवलं आहे. सुसाईड नोटमधील माहितीनुसार, त्याचे पालक त्याला पुरेसा वेळ देत नव्हते, त्यामुळे त्याने आत्महत्या करण्याचा मार्ग अवलंबला. पोलिसांना मिळालेल्या सुसाईड नोटमध्ये बारावीतील विद्यार्थ्याने लिहले आहे की, माझे आई-वडील आणि घरातील वडीलधाऱ्या मंडळीकडे माझ्यासाठी वेळ नाही, ते नेहमी व्यस्त असतात, त्यांनी मला सर्वकाही दिलं आहे मला कशाचीच कमतरता भासू दिली नाही. फक्त त्यांनी मला वेळ दिला नाही. याशिवाय त्याने तमाम पालकांना विनंती देखील केली की आपल्या मुलांना वेळ द्या, नाहीतर माझ्यासारखेच एक दिवशी ते हे सगळं एका कागदावर लिहून जातील.
आई-वडिलांकडे वेळ नाही म्हणून मुलाने केली आत्महत्या
हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे कारण पालकांनी मुलाला वेळ दिला नाही म्हणून मुलाने टोकाचे पाऊल उचलून आपले जीवन संपवले. या मृत मुलाचे वडील प्रोफेसर आहेत आणि आई एका ऑफिसमध्ये जॉब करत आहे. त्यामुळे दोघेही आपल्या मुलाला पुरेसा वेळ देऊ शकत नव्हते. मुलाच्या आई-वडिलांचे म्हणणे आहे की, त्यांचा मुलगा अभ्यासात खूप हुशार होता, दहावीमध्ये त्याला ९७ टक्के गुण मिळाले होते. तो बारावीच्या परीक्षेची तयारी करत-करत आयआयटीची देखील तयारी करत होता.