जिंतूर (परभणी ) : पॉकेट चोरीची घटना उघडकीस आणल्याचा राग मनात धरून एका ७ वर्षीय बालकाचा खून केल्याची घटना गुरुवारी घडली. याप्रकरणील आरोपीस पोलिसांनी २४ तासात अटक केली असून तो अल्पवयीन आहे. युवराज जाधव (७) असे मृत बालकाचे नाव असून तो शिवाजीनगर भागात राहत असे.
याबाबत अधिक माहिती अशी की, युवराज जाधव याचा गुरुवारी शहराच्या बाहेर मृतदेह आढळून आला होता. युवराजचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याने याबाबत शहरात उलटसुलट चर्चा होत्या. याप्रकरणी युवराजच्या वडिलांनी मुलाचा खून झाल्याचा दावा करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. यानंतर गुरुवारी रात्री उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेर्डीकर, पोलीस निरीक्षक सोनाजी आम्ले, उप निरीक्षक सुरेश नरवडे, सुनील अवसारमोल यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली.
मयत युवराज दिवसभर कोठे आणि कोणासोबत होता याचा तपास सुरु झाला. यावेळी त्याच्या घराजवळ असणाऱ्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो एका मुलासोबत दिसला. माहिती घेतली असता तो युवराजच्या मोठ्या भावाचा मित्र असल्याचे लक्षात आले. यानंतर आज सकाळी ८ वाजता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली. आरोपी हा विधीसंघर्षग्रस्त असून त्याने या पूर्वीसुद्धा युवराजला मारण्याचे प्रयत्न केले असल्याची कबुली दिली. या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक आणिस सय्यद, आर. आर. जगाडे, पोलीस कॉन्स्टेबल संगीता वाघमारे, राजकुमार पूडगे आदी कर्मचाऱ्यांनी तपासात सहभाग घेतला.
चोरी उघड केल्याने संपवलेआरोपीने सांगिलते की, मागीलवर्षी लग्नात एकाचे पैस्याचे पॉकेट मी उचलताना युवराजने पाहिले होते. यानंतर त्याने याची माहिती पॉकेटवाल्याला दिली. यावरून मला बेदम मारहाण करण्यात आली. यामुळे मी युवराजला संपविण्याचे ठरवले. त्यासाठी तीन चार वेळेस प्रयत्न केले. मात्र,यश आले नाही. यानंतर मी युवराजच्या मोठ्या भावासोबत मैत्री केली. चांगली ओळख वाढल्यानंतर माझ्यावर कोणी शंका घेणार नाही हे मला माहित होते. गुरुवारी रात्री मी त्याला खेळण्यासाठी दूर घेऊन गेलो आणि तेथेच त्याच्या डोक्यात दगड घालून खून केला. त्या रात्री मी घरी आलो नाही तर बाहेरच निर्जनस्थळी झोपलो.