पुणे : पबजी गेम खेळताना मोबाईल फुटल्याने नुकसान भरपाईची मागणी करीत तिघा अल्पवयीन मुलांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली. तसेच भांडण सोडविण्यासाठी आलेल्या काकाच्या हातावर कोयत्याने वार करुन जखमी केले. याप्रकरणी अभिषेक सिंग (वय १८, रा़ वडगाव शेरी) यांनी चंदननगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. चंदननगर पोलिसांनी तिघा अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना वडगाव शेरीमधील साईनगर येथे २० जुलैला रात्री साडेआठ वाजता घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक सिंग आणि आरोपी हे एकमेकांचे मित्र आहे. दोन महिन्यांपूर्वी अभिषेकने पबजी गेम खेळण्यासाठी एकाचा मोबाईल घेतला होता. खेळताना तो मोबाईल पडल्याने त्याचे नुकसान झाले होते़. त्यामुळे ही मुले त्याच्याकडे नुकसान भरपाई म्हणून ३ हजार रुपये मागत होती. गेल्या दोन महिन्यांपासून अभिषेक त्यांना पैसे देतो, असे म्हणून पैसे देत नव्हता. ही मुले २० जुलै रोजी रात्री अभिषेककडे आली व त्याच्याकडे पैसे मागू लागली़ पैसे न दिल्याने त्याला मारहाण करु लागली होती. हा प्रकार त्याचे काका रुदलसिंग यांनी पाहिला व त्यांनी भांडणे सोडवून मुलांना तेथून हाकलून लावले. थोड्या वेळाने ही मुले परत आली व त्यांनी काकाच्या हातावर कोयत्याने वार करुन हाताने मारहाण केली. पोलीस उपनिरीक्षक व्ही़ एस मिसाळ अधिक तपास करीत आहेत.
पबजी खेळताना मोबाईल फुटल्याने मुलांनी केले कोयत्याने वार; वडगाव शेरीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 7:45 PM
तीन अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल
ठळक मुद्दे