पौड : महाशिवरात्री निमित्त आईसोबत निळकंठेश्वर येथे दर्शनासाठी गेलेली सात वर्षांची चिमुरडी सोमवार (दि. ४ मार्च ) पासून आकस्मिकपणे बेपत्ता झाली होती. त्यानंतर तिच्या कुटुंबाने मुलगी हरवल्याची तक्रार पौड पोलीस ठाण्यात दिली होती. तेव्हापासून पोलिसांकडून दिवसरात्र तिचा शोध घेतला जात होता. मात्र, गुरुवारी (दि.७ मार्च) या सात वर्षीय चिमुरडीचा मृतदेह मुळशी तालुक्यातील डावजे परिसरात आढळून आला. श्रुतिकुमारी परशुराम साह (वय -७) या मयत चिमुरडीचे नाव आहे. पोलिसांकडून चिमुरडीची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रुतीकुमारी ही ता. ४ मार्च रोजी महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपल्या आई-बरोबर निळकंठेश्वर मंदीरात दर्शनासाठी गेली असताना आईचा हात सुटून अचानक बेपत्ता झाली होती. बराच वेळ शोध घेऊनही श्रुती न सापडल्याने ती हरवल्याची तक्रार त्याच दिवशी पौड पोलीस स्टेशनला दाखल केली होती. पौड पोलीस त्यादिवसापासून अहोरात्र तपास करत होते. दुर्देवाने गुरुवारी (दि.७) रोजी पोलिसांना डावजे परिसरात तिचा मृतदेह आढळला. अज्ञाताकडून श्रुतीची हत्या करण्यात आल्याचा अंदाज आहे. शविच्छेदन व पुढील तपासणीसाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठव्यिात आल्याची माहिती पौड पोलीस स्टेशनच्या एपीआय रेखा दूधभाते यांनी दिली, पोलीस पुढील तपास करत आहे.
महाशिवरात्रीच्या दिवशी अचानक बेपत्ता झालेल्या चिमुरडीचा मृतदेह सापडला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2019 12:31 PM