वासुदेव पागी, पणजी: केंद्रीय नार्कोटिक कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) गोवा विभागाने सराईत तस्कर कायतान फर्नांडिस याच्या आसगाव येथील घरावर छापा टाकला असता त्याच्या धाकटा मुलगा मर्वीन फर्नांडिस याला च्याकडून ११ हजार रुपये किमतीचे १ ग्रॅम कोकेन आणि १ ग्रॅम चरस जप्त केले. यापूर्वी कायतान आणि त्याच्या थोरल्या मुलाला एनसीबीने अटक केली होती.
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आसगाव-बार्देश येथे छापा टाकून सराईत तस्कर कायतान फर्नांडिस याला अटक केली होती. एनसीबीने आता त्याचा धाकटा मुलगा मर्विन फर्नांडिस यालाही अटक केली आहे. त्याच्याकडून ११ हजार रुपये किमतीचे १ ग्रॅम कोकेन आणि १ ग्रॅम चरस जप्त केले आहे.
आसगाव येथील सराईत तस्कर कायतान फर्नांडिस ड्रग्ज तस्करीत पुन्हा सक्रिय झाल्याची माहिती गुप्तहेरांकडून एनसीबीला मिळाली होती. त्यानुसार, एनसीबीने शनिवार ६ जानेवारी रोजी कायतान फर्नांडिसच्या घरी छापा टाकला. त्याच्याकडे ८० हजार रुपये किमतीचे चरस आणि कोकेन जप्त केले होते. त्यामुळे एनसीबीने त्याच्याविरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्याच्या विविध कलमाखाली गुन्हा दाखल करून अटक केली होती.
एनसीबीला कायतान आणि त्याच्या कुटुंबीयांविषयी आणखी माहिती मिळाल्यामुळे एनसीबीने पुन्हा कायतान याच्या घरावर छापा टाकला त्यावेळी एनसीबीला आणखी अमली पदार्थ सापडला. कायतानचा मुलगा मर्वीन याला या प्रकरणात अटक करण्यात आली असल्याची माहिती एनसीबीच्या सूत्रांकडून देण्यात आली. अटक करण्यात आलेला संशयित मर्वीन फर्नांडिस याला म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयाने न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे. मर्वीन फर्नांडिस याने न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला असून सुनावणी ३० जानेवारी रोजी होणार आहे. संशयित मर्वीन याच्या मोठा भाऊ मायरन फर्नांडिस याला गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने २०१७ मध्ये ड्रग्ज बाळगल्या प्रकरणी अटक केली होती.