डेस मॉनिस : आई-मुलांच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. आपल्याच मुलांना त्यांच्या मुलभूत आणि नैसर्गिक हक्कांपासून दूर ठेवल्याप्रकरणी एका आईला अटक करण्यात आली आहे. हा प्रकार आयोवा देशाच्या डेस मॉनिस या शहरात घडला आहे. तिच्या मुलांनीच आईविरोधात साक्ष दिली आहे. या केसची पुढील सुनावणी आता ८ जानेवारीला आहे.
टाईम या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, निकोल फिन असं त्या ४३ वर्षीय महिलेचं नाव आहे. निकोलच्या मुलांनी बुधवारी दिलेल्या साक्षीनुसार, नॅटली ही त्यांची बहिण प्रचंड अशक्त झाली होती. तिला धड उठताही येत नव्हतं. मात्र तिच्या अशा परिस्थितीतही तिच्या आईने म्हणजेच निकोलने तिला काहीच मदत केली नाही. तिला जेवायला दिलं नाही. शिवाय स्वत: बेडवरून उठत नाही तोवर खायाला देणार नाही, असा दमही तिला भरला. नॅटलीमध्ये एवढा अशक्तपणा आला होती की तिला उठता येणंही शक्य नव्हतं. निकोलच्या अशा वागण्यामुळे शेवटी नॅटलीला आपला जीव गमवावा लागला. २०१६ च्या ऑक्टोबर महिन्यात वयाच्या १६ व्या वर्षी तिचं निधन झालं. तिचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या भावंडांनी आपल्या आईविरोधात खटला दाखल केला. मुलांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, निकोल हिच्यावर खून आणि लहान मुलांवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
न्यायालयात हे प्रकरण गेल्यानंतर निकोलच्या मुलांनी अनेक धक्कादायक माहिती समोर आणल्या. आपल्याच मुलांना अशी वागणूक देणाऱ्या या आईविषयी त्या मुलांच्या मनात द्वेष निर्माण झाला होता. तिच्या मुलांनी दिलेल्या साक्षीनुसार, निकोलच्या परवानगीशिवाय तिची मुलं घराबाहेरही पडू शकत नव्हती. एवढंच नव्हे तर घरातील बाथरुमही निकोलच्या परवानगीशिवाय तिची मुलं वापरू शकत नव्हती. त्यामुळे त्यांना आपल्या बेडरुममध्येच नैसर्गिक विधी उरकाव्या लागत होत्या. घराबाहेर पडणं किंवा जेवणं यासाठीही आईची सतत परवानगी घ्यावी लागत असल्याचं तिच्या मुलांनी सांगितलं. या गोष्टींसाठी परवानगी घ्यायला गेल्यास एकतर आई घरी नसायची आणि असलीच तरी ती केव्हाच परवानगी द्यायची नाही. एकदा तर सलग दोन आठवडे ती दोन्ही भावंडे उपाशी राहिली असल्याचीही माहिती या मुलांनी दिली आहे.
गुन्हेविषयक बातम्यांसाठी येथे क्लिक करा.
आणखी वाचा - माता न तू वैरिणी ! मुलाच्या हव्यासापोटी तीन महिन्याच्या मुलीची गळा दाबून हत्या
‘नॅटलीच्या मृत्यूच्या आदल्या रात्री आईने पाण्यातून एक इंजेक्शन दिलं होतं. इंजेक्शन दिल्यानंतर तिनं आम्हाला झोपायला सांगितलं. त्यानंतर थोड्यावेळाने नॅटलीला उलट्या होऊ लागल्या. तसंच तिला श्वासोच्छवास घेणंही कठीण झालं होतं. तिची ही अवस्था पाहून डॉक्टरांना बोलवण्यात आलं. तोपर्यंत आईने तिला प्राथमिक उपचाराकरता औषध दिलं. पण तरीही नॅटलीचा मृत्यू झाला,’ अशी साक्ष निकोलच्या मोठ्या मुलाने दिली आहे. आता पुढची सुनावणी जानेवारीत होणार असून त्यावेळेसही काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. पण आईनेच आपल्या पोटच्या मुलांना असा त्रास दिला हे ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पोलिसा आणि न्यायालय अधिक चौकशीतून काही माहिती शोधण्याचा प्रय़त्न करत आहेत. (फोटो - प्रातिनिधिक)