नालासोपारा : आचोळे गावातील चिमघर येथे सात ते आठ आरोपींनी लाकडी बांबूने मारहाण केल्यामुळे एका ४६ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. हा गुन्हा तेथील सीसीटीव्हीमुळे उघड झाल्याने तुळिंज पोलिसांनी शनिवारी हत्येचा गुन्हा दाखल करून चार आरोपींना अटक केली आहे. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत पुढील तपास करीत आहेत.
आचोळे गावातील बंगल्यासमोर २६ मार्चला दुपारी विरारच्या डोंगरपाडा येथे राहणारे रमेश राठोड (४६) यांना काही जणांनी लाकडी बांबूने बेदम मारहाण केल्यावर ते तक्रार देण्यासाठी रक्तबंबाळ अवस्थेत तुळिंज पोलीस ठाण्यात आले होते. साहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत अवघडे यांनी मनपा हॉस्पिटलमध्ये औषधोपचार करण्यासाठी जाण्यास सांगून चिठ्ठी लिहून दिली. जखमी अवस्थेत ते विजयनगरच्या मनपा रुग्णालयात गेले आणि १० ते १५ मिनिटांत त्यांचा मृत्यू झाला. हॉस्पिटलमधून कागदपत्रे आल्यावर तुळिंज पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सोपारा प्राथमिक केंद्रात पाठविला.
शनिवारी २७ मार्चला सकाळी १० वाजता वैद्यकीय अधिकारी भडकवार यांनी मयताच्या शरीरावरील कपडे काढल्यावर डाव्या खांद्यावर, उजव्या हाताच्या पंजावर, डाव्या हाताची अनामिका व मधील बोट वाकडे होते. दोन्ही पायांच्या मांड्यांवर, गुडघ्यांवर मारहाण झाल्याने काळे निळसर डाग पडलेले होते. डाव्या कानावर मारहाणीमुळे डाग व डोक्यावर कोणत्या तरी वस्तूने आघात झाल्याने रक्तस्राव होऊन मृत्यू झाला असल्याचा शवविच्छेदन अहवाल तुळिंज पोलिसांना दिल्यावर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली.
तुळिंज पोलिसांनी आचोळे गावातील चिमघर आळी येथे विचारपूस करून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी केली. यात जमावाने लाकडी बांबूने मारहाण करतानाचे चित्रीकरण कैद झालेले पोलिसांना दिसले. पोलिसांनी आरोपी रमेश तीर्थे, वामन पाटील, रवींद्र पाटील, संदीप दळवी आणि दत्ता किसन वाघ या पाच जणांना अटक केली आहे. फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे.
या प्रकरणी पाच आरोपींना अटक केली असून नेमकी हत्या कोणत्या कारणामुळे झाली याचा शोध घेत आहोत. फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. आरोपींना वसई न्यायालयात हजर केल्यावर सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.- जी. जे. वळवी, पोलीस निरीक्षक, तुळिंज पोलीस ठाणे