डोंबिवली : इमारत बांधकामासाठी वापरण्यात येणारे स्टील चोरून बांधकाम व्यावसायिक आणि स्टिल व्यापाऱ्यांची फसवणूक करणाऱ्या आठ जणांच्या टोळीचा मानपाडा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. महत्त्वाचे म्हणजे आपली चोरी लपविण्यासाठी स्टीलचे मोजमाप करताना वजन काट्याला इलेक्ट्रॉनिक चिप लावून रिमोट कंट्रोलद्वारे मालाचे वजन वाढविले जात होते. या प्रकरणात सात आरोपी अटक केले असून, इलेक्ट्रिक चिप बनविणारा फरार आहे.
कल्याण-डोंबिवली परिसरात मोठ्या प्रमाणात नवीन संकुले उभी राहत आहेत. या बांधकामासाठी लागणारे स्टील नागपूर, जालना व अमरावती परिसरातून मागविण्यात येते. दरम्यान, वाहतुकीदरम्यान हे स्टिल चोरण्याचा प्रकार घडला होता. फसवणूक झालेल्या मनीष पमनानी यांनी ९ मे रोजी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. ट्रान्सपोर्ट कंपनीचे चालक व मालक यांना हाताशी धरून कंपनीतून स्टिलचा माल निघाल्यावर त्यातील काही माल भंगार व्यावसायिकाला विकून उर्वरित माल हा बांधकाम व्यावसायिकाच्या वजन काट्यावर आणल्यावर रिमोट कंट्रोलद्वारे मालाचे वजन वाढवून कमी प्रमाणात माल बांधकाम व्यावसायिकाला पुरवून स्वत:चा आर्थिक फायदा घेत असल्याचे या गुन्ह्याच्या तपासात उघडकीस आले. मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे, अविनाश वनवे, ज्ञानोबा सूर्यवंशी यांच्या पथकांनी सात जणांना अटक केली. नितीन चौरे, दिदारसिंग राजू, दिलबागसिंग गिल, हरविंदरसिंग तुन्ना, हरजिंदरसिंग राजपूत या वाहनचालक आणि मालकांसह इलेक्ट्रॅानिक चीप बसविणारा फिरोज मेहबूब शेख आणि शिवकुमार ऊर्फ मीता चौधरी अशी आरोपींची नावे आहेत.
दोन कोटींचा ऐवज जप्त आरोपींमधील फिरोज शेख याच्या विरोधात भंगार चोरीचे सहा गुन्हे दाखल आहेत. आरोपींकडून मालवाहू ट्रक, स्टील, इलेक्ट्रॉनिक चीप, रिमोट, मोबाइल फोन, असा दोन कोटी आठ लाख एक हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.